‘शाळा सिद्धी’मध्ये कोल्हापूर जिल्हा राज्यात दुसरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2021 04:26 AM2021-09-19T04:26:07+5:302021-09-19T04:26:07+5:30
कोल्हापूर प्राथमिक शाळांसाठीच्या ‘शाळा सिद्धी’ उपक्रमामध्ये कोल्हापूर जिल्हा परिषदेने राज्यात दुसऱ्या क्रमांकाचे स्वयंमूल्यमापन केले आहे. यातील ...
कोल्हापूर प्राथमिक शाळांसाठीच्या ‘शाळा सिद्धी’ उपक्रमामध्ये कोल्हापूर जिल्हा परिषदेने राज्यात दुसऱ्या क्रमांकाचे स्वयंमूल्यमापन केले आहे. यातील ‘अ’ वर्ग शाळांचे बाह्यमूल्यमापन झाल्यानंतर संबंधित शाळांना प्रमाणपत्रे दिली जातात.
या उपक्रमातंर्गत शाळेने स्वयंमूल्यमापन करून त्याचे गुण भरावयाचे असतात. यामध्ये मूलभूत सुविधा, शैक्षणिक गुणवत्तेसह अन्य निकषांचा समावेश असतो. ९९.९१ टक्के गुण मिळवून पालघर जिल्हा पहिल्या क्रमांकावर आहेत, तर कोल्हापूर जिल्हा परिषद ९९.५ टक्के गुण मिळवून दुसऱ्या क्रमांकावर आहे. सांगली जिल्हा परिषदेने ९८.८२ टक्के गुण मिळवून तिसरा क्रमांक पटकावला आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात ३ हजार ६६५ शाळा असून, त्यापैकी ३ हजार ६३० शाळांचे स्वयंमूल्यमापन करण्यात आले आहे, तर ३५ शाळांचे स्वयंमूल्यमापन झालेले नाही. यातील काही शाळा कोरोनामुळे बंदच आहेत. मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, प्राथमिक शिक्षणाधिकारी आशा उबाळे यांनी सर्व शिक्षकांचे अभिनंदन केले आहे.