दादा लाड यांच्याकडेच "कोजिमाशी"; सत्तारूढ पॅनेलची विजयाच्या दिशेने वाटचाल
By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2022 02:20 PM2022-07-10T14:20:16+5:302022-07-10T14:30:30+5:30
काल, शनिवारी मोठ्या चुरशीने मतदान पार पडले. यावेळी पद्माराजे गर्ल्स हायस्कूल केंद्रावर आसगावकर पॅनेलचे मतदार मतदानासाठी एकजुटीने आल्याने गोंधळ झाला असता पोलिसांनी सरांच्यावरच लाठीमार केला होता.
कोल्हापूर: जिल्हा माध्यमिक शिक्षण सेवक सहकारी पतसंस्थेच्या (कोजिमाशि) निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार, ४००० मोजणी पूर्ण झाली आहे. यामध्ये दादा लाड यांच्या नेतृत्वखालील सत्तारूढ स्वाभिमानी आघाडीने ४०० ते ७०० मतांची लीड घेतली आहे. यामुळे पुन्हा एकदा लाड यांच्याकडेच सत्तेची सूत्र राहणार असल्याचे चित्र आहे. थोड्याच वेळात निकालाचे सर्व चित्र स्पष्ट होईल.
काल, शनिवारी मोठ्या चुरशीने मतदान पार पडले. यावेळी पद्माराजे गर्ल्स हायस्कूल केंद्रावर आसगावकर पॅनेलचे मतदार मतदानासाठी एकजुटीने आल्याने गोंधळ झाला असता पोलिसांनी सरांच्यावरच लाठीमार केला होता.
‘कोजिमाशि’साठी शिक्षक नेते दादा लाड यांच्या नेतृत्वखालील सत्तारूढ स्वाभिमानी आघाडी व शिक्षक आमदार प्रा. जयंत आसगावकर यांच्या नेतृत्वाखालील राजर्षी शाहू लोकशाही विकास आघाडी यांच्यात सरळ लढत होत आहे. गेले पंधरा दिवस ऐन पावसात प्रचाराचा धुरळा उडाला आहे. पतसंस्थेच्या कारभाराबरोबरच व्यक्तिगत आरोप-प्रत्यारोपांची राळ उडाली होती. साम, दाम, दंड या नीतीचा दोन्ही पॅनलकडून वापर झाला. त्यामुळे ‘सर’ कोणाच्या पदरात आपले मताचे दान टाकणार याकडे सर्वांचे लक्ष लागून होते. मात्र आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार दादा लाड यांच्या नेतृत्वाखाली आघाडीने आघाडी घेतली आहे.
पतसंस्थेचे ८५२० सभासद -
पतसंस्थेचे ८५२० सभासद आहेत. त्यांपैकी सर्वाधिक १६७४ हे हातकणंगले तालुक्यातील आहेत. कागल ९२६, करवीर ८९२, तर कोल्हापूर शहरात ८३३ मतदार आहेत. त्यामुळे दोन्ही पॅनलकडून चार ठिकाणीच ताकद लावली गेली.
तालुकानिहाय मतदान असे -
कोल्हापूर शहर - ८३३, करवीर - ८९२, हातकणंगले - १६७४, कागल - ९२६, राधानगरी - ६२९, भुदरगड - ५५५, पन्हाळा - ७१७, शाहूवाडी - ३५४, शिरोळ - ७००, गडहिंग्लज - ४२१, आजरा - २०७, चंदगड - ३९०, गगनबावडा - १४०, स्वामी शिक्षण संस्था -७६, रयत शिक्षण संस्था- ६