कोल्हापूर जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करावा, किसान सभेचे पिठलं-भाकरी आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2018 05:59 PM2018-11-12T17:59:23+5:302018-11-12T18:01:39+5:30
कोल्हापूर जिल्ह्यात प्राथमिक पाहणीत चार तालुके दुष्काळसदृश जाहीर झाले होते, परंतु सरकारने जाहीर केलेल्या दुष्काळी तालुक्यात कोल्हापूर जिल्ह्याचा समावेश केलेला नाही. त्यामुळे सरकारचा निषेध करण्यासाठी महाराष्ट्र राज्य किसान सभेतर्फे सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पिठलं-भाकरी आंदोलन करण्यात आले. तसेच यावेळी हातकणंगले, शिरोळ, राधानगरी, गगनबावडा तालुक्यांत दुष्काळ जाहीर करण्याची मागणीही करण्यात आली.
कोल्हापूर : जिल्ह्यात प्राथमिक पाहणीत चार तालुके दुष्काळसदृश जाहीर झाले होते, परंतु सरकारने जाहीर केलेल्या दुष्काळी तालुक्यात कोल्हापूर जिल्ह्याचा समावेश केलेला नाही. त्यामुळे सरकारचा निषेध करण्यासाठी महाराष्ट्र राज्य किसान सभेतर्फे सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पिठलं-भाकरी आंदोलन करण्यात आले. तसेच यावेळी हातकणंगले, शिरोळ, राधानगरी, गगनबावडा तालुक्यांत दुष्काळ जाहीर करण्याची मागणीही करण्यात आली.
यावेळी आंदोलकांनी सोबत आणलेली पिठलं-भाकरी खाऊन सरकारचा निषेध नोंदविला. यानंतर मागण्यांचे निवेदन जिल्हा प्रशासनाला सादर करण्यात आले. राज्यातील १५१ तालुक्यांत शासनातर्फे दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे.
दुष्काळ जाहीर करण्याचे राज्य सरकारचे पूर्वीचे निकष बदलून केंद्र सरकारने जाहीर केलेल्या नवीन निकषांआधारे पाहणीद्वारे दुष्काळ जाहीर झाल्याने राज्यातील सुमारे शंभर तालुक्यांवर अन्याय झाला आहे. गाववार आणेवारीचे राज्य सरकारचे निकष बदलून उंबरठा उत्पादनाचे नवे निकष तालुका पातळीवर लावल्याने हा अन्याय दिसून येत आहे.
सॅटेलाईटद्वारे पाहणीचे निकष तज्ज्ञांच्या मतांप्रमाणे ७० टक्क्यांपर्यंत बरोबर असतात असे मत आहे. त्यामुळे ही पाहणी सदोष असू शकते. या चुकांचा बळी प्रत्यक्षात जे दुष्काळग्रस्त शेतकरी आहेत त्यांना बसत आहे. त्यामुळे गाववार आणेवारीप्रमाणे गावे दुष्काळग्रस्त म्हणून सरकारने जाहीर करावीत, अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली.
आंदोलनात जिल्हाध्यक्ष वाय. एन. पाटील, जिल्हा सचिव नामदेव पाटील, बी. एल. बरगे, अनिल चव्हाण, सतीशचंद्र कांबळे, शिवाजी जाधव, कृष्णा पानसे, सपना पानसे, प्रशांत आंबी, आरती रेडेकर, केरबा ताटे, महेश लोहार, आदी सहभागी झाले होते.