कोल्हापूर जिल्ह्याचे नामकरण राजर्षी छत्रपती शाहू महाराज जिल्हा करावे, जोगेंद्र कवाडे यांची मागणी
By संतोष.मिठारी | Published: August 10, 2022 06:31 PM2022-08-10T18:31:03+5:302022-08-10T18:32:08+5:30
Jogendra Kawade: कोल्हापूरचे नामकरण राजर्षी छत्रपती शाहू महाराज जिल्हा असे करावे, अशी मागणी पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी केली.
- संतोष मिठारी
कोल्हापूर - हर घर तिरंगा अभियानाला संविधान जोडले असते, तर लोकशाहीचा अधिक गौरव झाला असता. पण, अजून वेळ गेलेली नाही. संविधानचा जागर देशभरात होण्यासाठी हर घर संविधान अभियान राबविण्याची भूमिका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घ्यावी, असे आवाहन पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी बुधवारी येथे पत्रकार परिषदेत केले. कोल्हापूरचे नामकरण राजर्षी छत्रपती शाहू महाराज जिल्हा असे करावे, अशी मागणी त्यांनी केले.
संविधान जनतेचा सन्मान, स्वाभिमान असून ते आपल्या जीवनाशी किती जोडले गेले आहे. त्याची जाणीव प्रत्येकाला होण्यासाठी दि. १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान हर घर तिरंगासोबत संविधान अभियान राबविण्यात यावे. राज्याचे भाग्यविधाते आणि सामाजिक न्यायाचे प्रतिक असणाऱ्या राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे नाव कोल्हापूर जिल्ह्याला राज्य सरकारने द्यावे. कोल्हापुरातील रेल्वे स्थानकासमोरील राजर्षी शाहूंचे विश्रामगृह हे त्यांच्या आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ऋणानुबंधाचे प्रतिक आहे. त्याठिकाणी स्मृतिभवन आणि सुसज्ज असे ग्रंथालय करावे. त्याबाबत मंत्री चंद्रकांत पाटील यांनी युतीचे सरकार असताना जिल्हा प्रशासनाला सूचना केली होती. त्यावर पुढील कार्यवाही लवकर व्हावी, अशी मागणी प्रा. कवाडे यांनी केली.
इव्हेंट साजरा करण्याचे पातक करू नका
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे इव्हेंट करण्याचे कौशल्य आहे. ते आपण सर्वांनी नोटाबंदी, कोरोनावेळी पाहिले आहे. स्वातंत्र्याच्या लढ्यात ज्यांनी कधी सहभाग घेतला नाही. ज्यांनी तिरंगा ध्वजाला विरोध केला. ती मंडळी आता हर घर तिरंगा अशी घोषणा देत आहेत. ते केलेल्या पापाचे पाश्चाताप करत असून त्याचे आम्ही स्वागत करतो. मात्र, इव्हेंट साजरा करण्याचे पातक त्यांनी करू नये, असे प्रा. कवाडे यांनी सांगितले.