कोल्हापूर जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयाचा मुक्काम हलला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2018 04:23 PM2018-11-14T16:23:21+5:302018-11-14T16:27:15+5:30
गेली २० वर्षे स्टेशन रोडवरील ट्रेड सेंटर या भाड्याच्या इमारतीतून जिल्ह्याच्या कृषी विभागाचा संसार चालविणारे जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालय आता स्वमालकीच्या जागेत स्थलांतरित होत आहे.
कोल्हापूर : गेली २० वर्षे स्टेशन रोडवरील ट्रेड सेंटर या भाड्याच्या इमारतीतून जिल्ह्याच्या कृषी विभागाचा संसार चालविणारे जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालय आता स्वमालकीच्या जागेत स्थलांतरित होत आहे.
कसबा बावडा येथील ‘आत्मा’ कार्यालयातील एका इमारतीची ५० लाख रुपये खर्चून डागडुजी करून झाली आहे. या नव्या जागेत उद्या, गुरुवारपासून जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालय सुरू होत आहे. या स्वमालकीच्या इमारतीत २० वर्षांनंतर पहिल्यांदाच कृषी विभागातील कर्मचारी मोकळा श्वास घेणार आहेत.
स्टेशन रोडवरील ट्रेड सेंटर इमारतीतील तिसरा मजला. पायऱ्यांवरून चढउतार शरीराची परीक्षा पाहणारा. एवढे करून आत गेले तर समोर दिसणारे दृश्य बघितले, की कशाला आलो म्हणावे अशी परिस्थिती. तरीही फायलींच्या ढिगाºयाच्या आडोशाला बसून काम करणारे पन्नासभर अधिकारी, कर्मचारी.
पायाखाली कधी उंदीर येतील याचा काही नेम नाही. असे हे १९९८ पासूनचे चित्र आहे, जिल्हा अधिक्षक कृषी कार्यालयाचे. मृद्संधारण, वसुंधरा पाणलोट, जलयुक्त शिवार, यांत्रिकीकरण, ठिबक यांसह दरवर्षी कोट्यवधीच्या २०० हून अधिक कृषी योजना राबविणाऱ्या या कार्यालयाचे कामकाज मात्र खुराडेवजा कार्यालयातून होत होते.
ट्रेड सेंटर ही खासगी इमारत आहे.
कोल्हापूर जिल्ह्याला जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयाची मंंजुरी मिळाल्यापासून याच इमारतीतील तिसऱ्या मजल्यावर ‘कृषी’चे कार्यालय सुरू आहे. मध्यंतरी उमेश पाटील हे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी असताना त्यांनी सर्वप्रथम या खुराडेवजा कार्यालयाला नवीन लुक देण्याचा प्रयत्न केला.
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांसह सर्व अधिकाऱ्यांसाठी त्यांनी स्वतंत्र केबिन्स करून घेतल्या. यामुळे कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी आणि येणाऱ्या-जाणाऱ्यांचा वावर थोडा सुखावह झाला; पण त्यानंतर काहीही दुरुस्ती वा सुधारणा न झाल्याने कार्यालयातील फाइलींचे ढीग वाढत गेले, उंदरांचा उच्छाद वाढला. टेबल-खुर्च्याही मोडकळीस आल्या.
यावरून अधिकारी, कर्मचाऱ्यांनी दुरुस्तीसाठी वारंवार पत्रव्यवहार केले. दोन वर्षांपूर्वी तर ‘दुरुस्ती करा अथवा स्थलांतर करा,’ असा आग्रहच अधिकारी, कर्मचाऱ्यांनी धरला. त्यानंतर सदर बाजार येथील कृषी विभागाच्या जागेवर कार्यालय बांधण्याच्या हालचाली सुरू झाल्या; पण तोही प्रस्ताव मागे पडला.
अखेरपूर्वी कसबा बावडा येथील ‘आत्मा’च्या कार्यालयातच हे कार्यालय स्थलांतरित करावे, असा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला. त्यासाठी ‘डीपीडीसी’तून ५० लाख रुपये मंजूर केले गेले. सहा महिन्यांपूर्वी इमारत ताब्यात घेऊन तिची डागडुजी करून घेतली. आता ही इमारत सुसज्ज झाली आहे.
२० वर्षांत एक कोटी रुपये भाड्यावर खर्च
दरमहा ४५ हजार रुपये निव्वळ भाडे म्हणून भरावे लागत होते. गेल्या २० वर्षांत एक कोटी रुपयापेक्षा अधिक रक्कम फक्त भाड्यावर खर्च झाली आहे. एवढ्या रकमेत एखादे नवीन कार्यालय उभे राहिले असते; पण शासकीय पातळीवरच्या उदासीनतेमुळे आजअखेर या कार्यालयाने आपला आतापर्यंतचा संसार याच कार्यालयातून केला.
२०० हून अधिक योजनांचा भार
जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयात आस्थापना, लेखा, वसुंधरा पाणलोट, मृद्संधारण, फलोत्पादन, सांख्यिकी हे प्रमुख सहा विभाग आहेत. येथे जलयुक्त शिवार, ठिबक, कृषी यांत्रिकीकरण या योजनांचे काम मोठ्या प्रमाणावर चालते. येथे एकूण ४५ अधिकारी, कर्मचारी कार्यरत आहेत. त्यांपैकी १५ जण कंत्राटी आहेत.