HSC Result2024: विभागात कोल्हापूर जिल्हा अव्वल, सातारा द्वितीय तर सांगलीचा तृत्तीय क्रमांक
By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2024 01:58 PM2024-05-22T13:58:03+5:302024-05-22T13:59:09+5:30
साडेआठ हजार विद्यार्थी प्रावीण्यासह प्रथम श्रेणीत
कोल्हापूर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने फेब्रुवारी-मार्च २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेत कोल्हापूर विभागाने ९४.२४ टक्के निकालासह राज्यात चौथा क्रमांक पटकाविला. गतवर्षीच्या तुलनेत यंदा ०.९६ टक्क्यांनी निकालात वाढ झाली असली तरी दोन स्थानांनी विभागाचा क्रमांक घसरला आहे. गतवर्षी कोल्हापूर विभागाने ९३.२८ टक्के निकालासह राज्यात दुसरा क्रमांक पटकाविला होता. दरम्यान, कोल्हापूर विभागात कोल्हापूर जिल्हा अव्वल ठरला. कोल्हापूरचा ९५.६६ टक्के निकाल लागला. सातारा जिल्ह्याने ९३.६३ टक्के गुणांसह द्वितीय, तर ९२.६८ टक्के गुणांसह सांगली तृतीय ठरला.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने फेब्रुवारी-मार्च २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल मंगळवारी दुपारी १ वाजता ऑनलाइन जाहीर करण्यात आला. कोल्हापूर विभागाच्या निकालाबाबत मंडळाचे कोल्हापूर विभागीय सचिव सुभाष चौगुले यांनी पत्रकार परिषदेत सविस्तर माहिती दिली.
राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या कोल्हापूर विभागीय मंडळातील कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यातील ८६१ कनिष्ठ महाविद्यालयांमधील १ लाख १४ हजार ३१९ विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली. १७५ केंद्रांवर झालेल्या या परीक्षेत १ लाख ७ हजार ७४१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यामध्ये कोल्हापूर जिल्ह्याचा निकाल ९५.६६, सातारा जिल्ह्याचा निकाल ९३.६३ तर सांगली जिल्ह्याचा निकाल ९२.६८ टक्के लागला.
दृष्टिक्षेपात विभागाचा निकाल
जिल्हा - प्रविष्ट विद्यार्थी - उत्तीर्ण विद्यार्थी - टक्केवारी
कोल्हापूर - ४९२१० - ४७०७६ - ९५.६६
सातारा - ३३७८९ - ३१६३७ - ९३.६३
सांगली- ३१३२० - २९०२८ - ९२.६८
मुलींची बाजी
कोल्हापूर विभागात ५३ हजार ७८१ मुलींनी बारावीची परीक्षा दिली. यापैकी ५२ हजार १७५ मुली उत्तीर्ण झाल्या. मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ९७.०१ टक्के आहे, तर विभागात ६० हजार ५३८ मुलांपैकी ५५ हजार ५६६ मुले उत्तीर्ण झाले. हे प्रमाण ९१.७८ टक्के इतके आहे.
साडेआठ हजार विद्यार्थी प्रावीण्यासह प्रथम श्रेणीत
विभागात ८ हजार ५६३ विद्यार्थ्यांनी ७५ टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवत प्रावीण्यासह प्रथम श्रेणी मिळवली आहे. ३२ हजार ४६२ विद्यार्थ्यांनी ६० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवले. ५३ हजार ३८ विद्यार्थ्यांनी ४५ टक्क्यांपेक्षा अधिक गुणांची कमाई केली. ३५ टक्के व त्यापेक्षा अधिक गुण मिळवणाऱ्यांची संख्या १३ हजार ६७८ इतकी आहे. दरम्यान विभागात ७५ टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या इतर जिल्ह्यांपेक्षा कमी आहे.