सुकन्या समृद्धी योजनेत कोल्हापूर जिल्हा देशात अव्वल, गुंतवले तब्बल 'इतके' कोटी; मुलींचे भवितव्य सुरक्षित
By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2023 05:25 PM2023-02-18T17:25:11+5:302023-02-18T17:27:33+5:30
वयाच्या १० वर्षांपर्यंत काढता येते खाते
कोल्हापूर : आपल्या मुलींचे भवितव्य आर्थिकदृष्ट्या सुरक्षित करत कोल्हापूरकरांनी पोस्टाच्या सुकन्या समृद्धी योजनेत तब्बल ३५६ कोटी, ३८ लाख ३४ हजार १०० रुपये इतक्या मोठ्या रकमेची गुंतवणूक केली आहे. जिल्ह्यात सध्या एक लाख २० हजार १६१ मुलींच्या नावे ही खाती सुरू असून या योजनेत कोल्हापूर जिल्हा राज्यातच नव्हे तर देशात अव्वल स्थानावर आहे.
बेटी बचाव बेटी पढाव, अभियानांतर्गत २०१५ साली पोस्ट ऑफीसमध्ये सुकन्या समृद्धी योजना सुरू झाली. तेव्हापासून जिल्ह्यातील नागरिकांनी या योजनेला भरभरून प्रतिसाद दिला आहे. पहिल्या वर्षी १२ हजार ७८१ मुलींच्या नावे दाेन कोटी ८३ लाख ६८ हजार ३० रुपयांपासून सुरू झालेला हा प्रवास आता तब्बल ३५६ कोटींच्या पुढे गेला आहे.
वयाच्या १० वर्षांपर्यंत काढता येते खाते
मुलीच्या जन्मापासून १० वर्षे वयाच्या आतील मुलींच्या नावे हे खाते काढता येते. जास्तीत जास्त दोन मुलींच्या नावे खाते काढता येतात. ही योजना मुलीचे शिक्षण व लग्नासाठीच्या गुंतवणुकीचा सुरक्षित पर्याय आहे.
७.६ टक्के व्याज
कमीतकमी २५० रुपये भरून खाते काढता येते व जास्तीत दीड लाखांपर्यंत रक्कम भरता येते. एका महिन्यात किंवा वर्षात कितीही वेळा पैसे भरता येतात. या योजनेवर सर्वाधिक व्याजदर ७.६ टक्के आहे व गुंतवणुकीवर चक्रवाढ व्याज मिळते. या योजनेतील गुंतवणूक ८० सी अंतर्गत करमुक्त आहे.
पैसे कधी काढता येणार?
योजनेचा कालावधी २१ वर्षे किंवा मुलीच्या लग्नापर्यंत आहे. १८ वर्षांनी या खात्यातून जमा रकमेच्या जास्तीत जास्त ५० टक्क्यांपर्यंत पैसे काढता येतात. खाते काढून २१ वर्षे पूर्ण झाल्यावर मुदत पूर्ण होते व खाते बंद करता येते.
खाते काढण्यासाठी काय कागदपत्रे लागतात?
मुलीच्या जन्म तारखेला दाखला, पालकांचे ओळखपत्र व रहिवासी दाखल्याची झेरॉक्स, पालकांचे दोन फोटो.