Hasan Mushrif: मंत्री हसन मुश्रीफांच्या टोपीखाली नेमकं दडलंय काय?, गांधी टोपीची जिल्हाभर चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2022 12:46 PM2022-06-07T12:46:33+5:302022-06-07T12:59:01+5:30
पालकमंत्री सतेज पाटील यांच्याही दाढीची चर्चा
समीर देशपांडे
कोल्हापूर : ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी फेटा बांधायचे सोडून दिले आहे. मात्र पांढरी शुभ्र टोपी गेल्या महिन्यापासून ते वापरत आहेत. त्यांच्या या टोपीखाली दडलंय काय अशी विचारणा आता जिल्हाभरातून होत आहे. याबाबत मी नंतर सांगेन असे म्हणत मुश्रीफ यांनीही याबाबतचे ‘गुपित’ कायम राखले आहे.
कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या शिवराज्याभिषेक दिनाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या ‘शिवस्वराज्य’ कार्यक्रमामध्ये गुढी उभारण्यासाठी मुश्रीफ आणि पालकमंत्री सतेज पाटील सोमवारी भल्या सकाळी कागलकर हाऊसच्या प्रांगणात उपस्थित होते. आधी पालकमंत्री आले. त्यांना फेटा बांधण्यासाठी खुर्चीत बसवण्यात आले. दुसऱ्या मिनिटाला मुश्रीफ दाखल झाले. पाटील यांनी मुश्रीफ यांना फेटा बांधण्यासाठी बसण्याची विनंती केली.
मात्र मुश्रीफ म्हणाले, मी फेटा बांधून घेणार नाही. या टोपीखाली दडलंय काय हे मी नंतर सांगेन. असे म्हणत मुश्रीफ यांनी टोपी परिधान का केली याचे ‘गुपित’ तसेच कायम ठेवले. गेल्या महिन्यापासून मुश्रीफ यांच्या डोक्यावर पांढरी शुभ्र गांधी टोपी दिसून येत आहे. सुरुवातीला केस काळे करताना डोक्यावर जरा काळा डाग पडल्याने त्यांनी टोपी वापरायला सुरूवात केली.
परंतु महिना उलटून गेला तरी त्यांनी टोपी काढलेली नाही. कागल तालुक्यातील रविवारी झालेल्या कार्यक्रमातही त्यांनी सत्कारावेळी फेटा बांधून घेतला नाही. त्यांचे आता जिगरी दोस्त झालेले संजयबाबा घाटगे यांनीही मग फेटा नाकारला. फेटा नाकारून मुश्रीफ गांधी टोपीकडे कसे वळले याची चर्चा सुरू झाली आहे.
कार्यकर्त्यांच्या मते ही असू शकतात कारणे
- राष्ट्रवादीच्या आमदारांची संख्या वाढवण्याचा पण
- जिल्हा परिषदेचा अध्यक्ष, कोल्हापूर महापालिकेचा महापौर राष्ट्रवादीचा करणार
- त्यांच्याविरोधात जी आरोपांची राळ उडवली जात आहे त्यातून निर्दोष सिद्ध होत नाही ताेपर्यंत फेटा बांधणार नाही अशी असू शकते प्रतिज्ञा.
- यापेक्षा काही वेगळे कारण असल्यास ते मात्र गुपितच.
सतेज पाटील यांच्याही दाढीची चर्चा
पालकमंत्री सतेज पाटील यांच्याही दाढीची चर्चा सुरू आहे. याआधीही दक्षिणमधून पराभव झाल्यानंतर सतेज पाटील यांनी दाढी वाढवली होती. त्यानंतर एकेक करत त्यांनी ‘आमचं ठरलंय’ म्हणत महाडिक परिवाराची सत्तास्थाने उद्ध्वस्त केली. आता आणखी त्यांनी कुठला नवा पण केला आहे याचीच जिल्ह्यात चर्चा आहे.