कोल्हापूर जि. प. सीईओपदाचा कार्तिकेयन एस. यांनी स्वीकारला कार्यभार
By समीर देशपांडे | Published: March 20, 2024 11:07 AM2024-03-20T11:07:36+5:302024-03-20T11:09:06+5:30
नवीन सीईओ वेळेत आले, निम्मेच विभागप्रमुख गडबडीत आले
समीर देशपांडे, लोकमत न्यूज नेटवर्क, कोल्हापूर : जिल्हा परिषदेचे नवनियुक्त मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. हे पावणे दहाच्या दरम्यान जिल्हा परिषदेत आले आणि विभागप्रमुख, कर्मचाऱ्यांची एकच धावपळ उडाली. मावळते मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील यांनी त्यांचे स्वागत करताना केवळ सहाच विभागप्रमुख उपस्थित होते. मात्र नंतर एक एक विभागप्रमुख दाखल झाले आणि स्वागत समारंभ रंगत गेला.
पुणे स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी या पदावर कार्यरत असलेले कार्तिकेयन हे मंगळवारी दिल्लीत होते. दुपारी त्यांना बदलीचा मेसेज मिळाला. त्यानंतर ते तातडीने येण्यास निघाले. ते आज सकाळीच कार्यभार घेणार हे त्यांनी कळवले होते. त्यानुसार विभागप्रमुखांनाही कल्पना देण्यात आली होती. दहा वाजता संतोष पाटील आणि कार्तिकेयन यांना फेटा बांधण्यात आला. पाटील यांना निरोप देण्यात आला तर कार्तिकेयन यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी त्यांनी सर्व विभागप्रमुखांची ओळख करून घेतली. सर्व विभागांचे कामकाज उत्तम असून काम करण्यासाठी हा चांगला जिल्हा असल्याचे पाटील यांनी कार्तिकेयन यांना सांगितले.