‘राज्य नाट्य’ची मर्यादा नको : कोल्हापूर जिल्ह्याच्या नाट्य चळवळीला हवा वर्षभर बहर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2019 01:19 AM2019-12-10T01:19:06+5:302019-12-10T01:21:10+5:30
कोल्हापूरला जशी चित्रपटसृष्टीची मोठी परंपरा लाभली आहे, त्याचप्रमाणे नाट्यक्षेत्राचीही बीजे येथे रोवली गेली. संगीतसूर्य केशवराव भोसले, बालगंधर्व अशी मंडळी या मातीत घडली. संगीत नाटकांपासून सुरू झालेला हा प्रवास आता दोनअंकी नाटक, एकांकिकांपर्यंत येऊन पोहोचला आहे.
इंदुमती गणेश ।
कोल्हापूर : ‘राज्य नाट्य’चे बिगुल वाजले की कोल्हापुरातील सर्व संघ जोमाने तयारीला लागतात. महिनाभर प्रेक्षकांना दर्जेदार नाटकांचा आस्वाद मिळतो; पण एकदा स्पर्धा संपली की, सगळेजण पुढच्या वर्षीच्या राज्य नाट्य स्पर्धेपर्यंत निवांत होतात, असा आजवरचा अनुभव आहे. कोल्हापुरातील नाट्यसृष्टी बहरायची असेल तर वर्षभर प्रायोगिक आणि व्यावसायिक पातळीवर संघांनी नाटकांचे सादरीकरण सुरू ठेवणे अणि त्यांना रसिकांची साथ मिळणे तितकेच गरजेचे आहे.
कोल्हापूरला जशी चित्रपटसृष्टीची मोठी परंपरा लाभली आहे, त्याचप्रमाणे नाट्यक्षेत्राचीही बीजे येथे रोवली गेली. संगीतसूर्य केशवराव भोसले, बालगंधर्व अशी मंडळी या मातीत घडली. संगीत नाटकांपासून सुरू झालेला हा प्रवास आता दोनअंकी नाटक, एकांकिकांपर्यंत येऊन पोहोचला आहे. राज्य नाट्य स्पर्धेवेळी झालेल्या गैरकारभारामुळे २० वर्षांपूर्वी कोल्हापूरचे प्राथमिक केंद्र हटविले गेले. त्यानंतर ‘प्रतिज्ञा नाट्यरंग’च्या प्रशांत जोशी यांच्या प्रयत्नांतून १० वर्षांपूर्वी सांस्कृतिक कार्य संचालनालयाने कोल्हापूरला पुन्हा मान्यता दिली आहे. पहिल्या वर्षी १० संघांपासून सुरू झालेल्या या स्पर्धेत आता २९ नाटके सादर होत आहेत. दिवाळी संपली की, संघांकडून ‘राज्य नाट्य’ची तयारी सुरू होते. लेखन, दिग्दर्शन, नेपथ्य, अभिनय, प्रकाशयोजना, संगीत, रंगभूषा, वेशभूषा या सगळ्या पातळ्यांवर जोमाने तयारी होते. नाटकांचे दर्जेदार सादरीकरण होते. स्पर्धा संपते, निकाल लागतो आणि पुन्हा सगळं काही थंडावतं ते अगदी पुढच्या ‘राज्य नाट्य’पर्यंत.
कोल्हापूरला लाभलेली नाट्यपरंपरा पुढे चालवायची असेल, जोपासायची आणि वाढवायची असेल तर केवळ ‘राज्य नाट्य’ला केंद्रस्थानी न ठेवता वर्षभर संस्थांच्या पातळीवर लहान-मोठे प्रयोग सुरू ठेवले पाहिजे. अशा प्रयोगांना रसिकांची दाद मिळणेही तितकेच गरजेचे आहे.
कामगार कल्याणचे केंद्रही कोल्हापूर
गेल्या दोन वर्षांत हिंदी राज्य नाट्य स्पर्धेची अंतिम फेरी, अंतिम फेरीतील विजेत्या संघांच्या नाटकांचा महोत्सव, बालनाट्य स्पर्धांमधून प्रेक्षकांना दर्जेदार नाटके पाहण्याची संधी मिळाली आहे. आता जानेवारी महिन्यात कामगार कल्याण मंडळाच्या वतीने नाट्य स्पर्धा होत आहेत. त्यात पुणे महसूल विभागाचे केंद्र म्हणून कोल्हापूरची निवड करण्यात आली आहे. ६ जानेवारीपासून ही स्पर्धा होत असून विभागात येत असलेल्या पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर या पाच जिल्ह्यांतील संघ यात सादरीकरण करणार आहेत.
राज्य नाट्य स्पर्धेत संघांना नाट्यगृह मोफत मिळते. सादरीकरणासाठी अर्थसाहाय्य केले जाते; त्यामुळे हौशी रंगभूमीवरचे अनेक प्रयोग या स्पर्धेत पाहायला मिळतात; पण वैयक्तिक अथवा व्यावसायिकदृष्ट्या नाटकाचा प्रयोग करणे आर्थिकदृष्ट्या अशा संघांना परवडणारे नसते. त्यामुळे हे कलाकार व्यासपीठ मिळण्यासाठी राज्य नाट्य स्पर्धेची वाट बघतात. ग्रामीण संघांचे सादरीकरण शहरातील संघांप्रमाणे चकचकीत किंवा सफाईदार नसते. त्यांना तळमळ, इच्छा आणि उत्साह तर असतो; पण योग्य मार्गदर्शन मिळत नाही.
- किरणसिंह चव्हाण, दिग्दर्शक