कोल्हापूर जिल्ह्यातील व्हिडीओ पार्लरना ना ‘कर’...ना डर -करमणूक विभागाला ठेंगाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2019 01:05 AM2019-03-01T01:05:17+5:302019-03-01T01:06:40+5:30

दिवसाला करोडो रुपयांची उलाढाल असलेल्या व्हिडीओ पार्लरची संख्या जिल्हा करमणूक विभागातील नोंदीनुसार फक्त १२५ आहे. प्रत्यक्षात गल्लीबोळांत या पार्लरचे पेव फुटले आहे. नियम व मशीनमध्येही या व्हिडीओचालकांनी हातचलाखी

Kolhapur district's video parlor is not 'tax' ... no scared for fear-making department | कोल्हापूर जिल्ह्यातील व्हिडीओ पार्लरना ना ‘कर’...ना डर -करमणूक विभागाला ठेंगाच

लक्ष्मीपुरीत व्हिडीओ पार्लरवर छापा टाकून मशीनची पाहणी करताना प्रशिक्षणार्थी पोलीस अधीक्षक ऐश्वर्या शर्मा.

Next
ठळक मुद्देकरोडोंची उलाढाल मात्र करमणूक विभागाला ठेंगाच; गल्लीबोळांत फुटले पेव

तानाजी पोवार ।
कोल्हापूर : दिवसाला करोडो रुपयांची उलाढाल असलेल्या व्हिडीओ पार्लरची संख्या जिल्हा करमणूक विभागातील नोंदीनुसार फक्त १२५ आहे. प्रत्यक्षात गल्लीबोळांत या पार्लरचे पेव फुटले आहे. नियम व मशीनमध्येही या व्हिडीओचालकांनी हातचलाखी केल्याने गेल्या ३१ महिन्यांत करमणूक विभागाला यांच्यापासून एक रुपयाचाही कर मिळालेला नाही. रोज करमणुकीच्या नावाखाली मशीनमध्ये ‘सेटिंग’ बदलून करोडो रुपयांचा जुगार पोलीस खात्याच्या सलगीने जिल्हाभर तेजीत सुरू आहे; तर खेळणारे कंगाल होत आहेत.

शासनाने केलेल्या नियमावलीत हातचलाखी करत आणि व्हिडीओ गेम्सच्या मशीनमध्ये फेरफार करून करोडो रुपयांची उलाढाल सुरू आहे. त्यात करमणूक शुल्काऐवजी जी. एस. टी. लागू केल्याने उत्पन्न व नियमांत हातचलाखी करून कर न भरण्याचा पवित्राच या पार्लरचालकांनी घेतला आहे. या व्यवसायातून फक्त फायदाच मिळत असल्याने त्याचे पेव फुटले आहे.

मुंबई करमणूक शुल्क अधिनियम १९२३ प्रमाणे शहरी भागात दरवर्षी प्रत्येक मशीनला ७५० रुपये कर, तर ७५ रुपये अधिभार द्यावा लागतो; तर ग्रामीण भागात प्रत्येक मशीनला ५०० रुपये आणि ५० रुपये असा अधिभार भरला जात होता. पण १ जुलै २०१७ नंतर हा नियम रद्द ठरवून ज्या व्हिडीओ पार्लरची वार्षिक उलाढाल २० लाखांपेक्षा अधिक आहे, त्यांना २८ टक्के जीएसटी कर लावला, त्यापेक्षा कमी उलाढाल असणाऱ्यांना हा जीएसटी लागू नाही. त्यामुळे या व्हिडीओ पार्लरमार्फत एका मशीनवर दोन किंवा तीन ग्राहक खेळल्याचे कागदोपत्री दर्शविले जाते. त्यामुळे २० लाखांपेक्षा कमी वार्षिक उलाढाल दर्शवून जी.एस.टी.मधून सुटका केली जाते. प्रत्यक्षात या मशीनमध्ये ‘सेटिंग’ बदलून रोज लाखो रुपयांची जुगाराची उलाढाल होते.

आता तर १ जानेवारी २०१९ पासून जी.एस.टी.ची मर्यादा वाढविली असून ती २० लाखांवरून ४० लाखांवर नेल्याने व्हिडीओ पार्लरना आणखीनच अभय मिळाले आहे. त्यामुळे गेल्या ३१ महिन्यांत या व्हिडीओ पार्लरमार्फत करोडो रुपयांची उलाढाल होऊनही एकही रुपया कर शासनाच्या गंगाजळीत जमा झालेला नाही. त्यामुळे कागदोपत्री किरकोळ संख्येने दिसणारी मशीन मात्र हजारोंच्या घरात कोट्यवधींची उलाढाल करीत आहेत.


मनुकुमार श्रीवास्तव समिती थंडच
व्हिडीओ पार्लरची संख्या, त्यापासून होणारी उलाढाल, गैरवापराचे प्रमाण, मशीनमधील सेटिंग, शासनाला मिळणारा कर, आदींबाबत अभ्यास करण्यासाठी गेल्या १९ महिन्यांपूर्वी मनुकुमार श्रीवास्तव यांची समिती स्थापन केली होती. पण या समितीच्या कामाचा अद्याप श्रीगणेशाही झाला नाही

पार्लरचे मोजमाप नाहीच
जिल्ह्यात कागदोपत्री फक्त १२५ व्हिडीओ पार्लर आहेत. प्रत्यक्षात गल्लीबोळांत ही पार्लरचे पेव फुटले आहे; पण या पार्लरचे अथवा व्हिडीओ मशीनच्या संख्येचे मोजमाप संबंधित विभागांकडून कधीही करण्यात आलेले नाही. त्यामुळे हा व्यवसाय करणारे सध्या जोमात आहेत.


पाच वर्षांत प्रथमच छापा
लक्ष्मीपुरी फोर्ड कॉर्नर परिसरात विकीचे ‘व्हिडीओ पार्लर,’ तर मंगेशचे ‘कॅसिनो’ सेंटर पोलिसांच्या वरदहस्ताने गेले पाच वर्षे सुरू होते. अधिकाऱ्यांशी लागेबांधे व संबंधामुळे येथे पोेलिसांचा छापाच पडला नाही. उलट संरक्षण मिळाले. अधिकाऱ्यांची अथवा त्यांच्या नातेवाइकांची भोजनापासून ते राहण्यापर्यंतची सोयही कॅसिनो मालकाच्या परिसरातील लॉजवरच मोफत केली जाते. अधिक महिन्याची चिरीमिरी. प्रशिक्षणार्थी अप्पर पोलीस अधीक्षक ऐश्वर्या शर्मा यांनी पदभार घेतल्याच्या दुसºया दिवशी त्यांच्यावर छापे टाकल्याने ‘कृपादृष्टी’ दाखविलेल्या अधिकाºयांची पंचाईत झाली.


शिवाय इचलकरंजी स्टँड, हातकणंगले मुख्य चौक, कुरुंदवाड, वडगाव, शिरोळ, कागल स्टॅँड, नागाव, निपाणी, शेणोली या ठिकाणीही कॅसिनोची केंद्रे सुरू आहेत.

‘अकबर’ गायब : दररोज लाखो रुपयांची देवघेव करणारा ‘कॅसिनो’चा मॅनेजर ‘अकबर’ हा छापा पडल्यापासून गायब आहे. तोच मंगेशच्या कॅसिनोतील सर्व व्यवहारांची सूत्रे पाहत होता. छाप्यानंतर काही सेकंदांत तोच सर्व सेंटर बंद करतो. मोबाईल टॅब अथवा लॅपटॉपवर ‘गेम’चा बॅलन्स लोड करून देण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी बजावतो.

लाखांची जीएसटीची मर्यादा केल्याने पार्लरना अभय

वरदहस्तावर ‘कॅसिनो, व्हिडीओ पार्लर’चे जाळे
पोलीस, राजकीय लागेबांधे : शहरात मुख्य सेंटरवरून आॅनलाईन जुगारावर नियंत्रण
कोल्हापूर : शहरात व्हिडीओ पार्लर आणि सॉफ्टवेअरच्या करामतीवर आॅनलाईन कॅसिनो जुगार खुलेआम खेळला जात आहे. येथे येणारे लाखो रुपये घेऊन येणारे ग्राहक रिकाम्या हाताने परततात. हप्त्याच्या ओझ्याखाली दबलेल्या पोलिसांच्या आणि राजकीय कृपादृष्टीने हा आॅनलाईन जुगार फोफावत असताना अनेकांची कुटुंबे उद्ध्वस्त झाली आहेत. कोल्हापूर शहरात किमान १४ ठिकाणी सुरू असलेल्या ‘कॅसिनो’च्या करोडो रुपयांच्या उलाढालीवर लक्ष्मीपुरी -फोर्ड कॉर्नर, पार्वती चित्रमंदिरानजीक, व्हीनस कॉर्नर चौक या ठिकाणांवरून नियंत्रण ठेवले जाते.

‘एका मिनिटात निकाल, लाखो रुपयांत मालामाल’ अशी तोंडी जाहिरात झाल्याने ‘कॅसिनो’ या आॅनलाईन व व्हिडीओ पार्लरमध्ये जुगाराकडे अनेक युवक व उद्योजक वळले आहेत. मंगेश, सम्राट, विकी यांनी व्यवसायात बस्तानच बसविले. कोल्हापुरात पोलीस स्टेशनच्या हाकेच्या अंतरावरील लक्ष्मीपुरी फोर्ड कॉर्नर हे ‘कॅसिनो’चे मुख्य केंद्र आहे. बाहेर लॉटरी सेंटर आत ‘कॅसिनो’ जुगार सुरू असतो. येथे कंगाल झालेल्या ग्राहकाला हाकलण्यासाठीची भूमिका पोलिसांकडूनच बजावली जाते. कोल्हापूर आणि इचलकरंजी ही दोन ‘कॅसिनो’ची करोडो रुपयांची उलाढाल करणारी ठिकाणे होत.


 

Web Title: Kolhapur district's video parlor is not 'tax' ... no scared for fear-making department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.