कोल्हापूर विभागात ४१ टक्के पेरण्या पूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 04:16 AM2021-06-11T04:16:49+5:302021-06-11T04:16:49+5:30
कोल्हापूर : संपूर्ण मे महिन्यात वादळी पावसाने लावलेल्या हजेरीने यंदा माॅन्सून सक्रिय होण्याआधीच कोल्हापूर, सांगली, सातारा या तीन जिल्ह्यांचा ...
कोल्हापूर : संपूर्ण मे महिन्यात वादळी पावसाने लावलेल्या हजेरीने यंदा माॅन्सून सक्रिय होण्याआधीच कोल्हापूर, सांगली, सातारा या तीन जिल्ह्यांचा समावेश असलेल्या कोल्हापूर विभागात ४१ टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. हे प्रमाण गतवर्षीपेक्षा चार टक्केंनी जास्त आहे. थांबून थांबून महिनाभर पाऊस कोसळत राहिल्याने जमिनीची मशागती सुलभ झाली आणि रोहिणी नक्षत्रापासून पेरणी सुरू झाली. चांगले वातावरण असल्याने पेरणी झालेले भात, सोयाबीनची पिके जूनच्या पहिल्या आठवड्यातच जमिनीवर डोलू लागली आहेत.
पावसाळा मृग नक्षत्रापासून सुरू होतो; पण यावर्षी वादळी पावसामुळे तो मे महिन्यातच सुरू झाल्याचे चित्र कोल्हापूर विभागात होते. त्यामुळे मेच्या मध्यापर्यंत बऱ्यापैकी शेतशिवारांच्या मशागती आटोपल्या होत्या. पावसाचा अंदाज बघून पेरणीला सुरुवातही झाली होती. जूनच्या पहिल्या आठवड्यातच पेरण्यांचा टक्का निम्म्यापर्यंत गेला आहे. भाताची तर धूळवाफ पेरण्याही करून ठेवल्या आहेत. आता रोप लागणीसाठीचे तरवे टाकण्याचे कामदेखील अंतिम टप्प्यात आहे. यावर्षी सोयाबीनला चांगला दर मिळाल्याने सोयाबीनचा पेराही जलद गतीने आटोपला जात आहे.
खते आणि बियाणे यांचा प्रचंड तुटवडा असतानादेखील शेतकऱ्यांनी पदरमोड बियाणे खरेदी करत पेरा साधण्याची कसरत केली आहे. ११ लाख २१ हजार ९७३ हेक्टरांवरील ४ लाख ४९ हजार ६३८ हेक्टरांवरील पेरण्या आतापर्यंत पूर्ण झाल्या आहेत. त्यात कोल्हापूरचे २ लाख ४ हजार २२४ , सांगलीचे १ लाग ५० हजार ५८८, साताऱ्याचे ९४ हजार ८२६ हेक्टरांवरील क्षेत्राचा समावेश आहे.
चौकट
विभागात कोल्हापूर प्रथम
विभागात ४१ टक्के पेरण्या झाल्या असल्यातरी जिल्हानिहाय आढावा घेतला तर ५६ टक्केसह कोल्हापूर पहिल्या क्रमांकावर आहे. सांगली ४२ टक्केसह दुुसऱ्या तर, सातारा २५ टक्केसह तिसऱ्या क्रमांकावर आहे.
विभागनिहाय पेरणी अहवाल
पीक पेरणी टक्केवारी
भात २२
ज्वारी १
बाजरी ३
मका ६
भूईमूग ६
सोयाबीन १३
नवीन ऊस लागणीही जोरात
आडसाली उसाचा हंगाम १५ जुलैपासून सुरू होत असलातरी आताच उसाच्या लागणीचा जाेर वाढला आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यातच कोल्हापुरात २४६ हेक्टर नवीन लागवड झाली आहे. सातारा आणि सांगलीत मात्र अजून लागणींना सुरुवात नाही.
फोटो: १००६२०२१-कोल-पेरणी
फोटो ओळ: आभाळ भरून येत आहे, काेणत्याही क्षणी जोरदार पाऊस सुरू होईल असे वातावरण असल्याने शेतकऱ्यांची पेरणीसाठी शिवारात एकच घाई उडाली आहे. पेरणी करून त्यावर दींड मारून परतत असतानाचे कासारवाडी (ता. करवीर) येथे टिपलेले हे छायाचित्र शेतकऱ्यांची लगबग अधोरेखित करते.
(छाया : नसीर अत्तार)