कोल्हापूर विभागाने एस.टी.च्या कर्नाटककडे जाणाऱ्या ६६० फेऱ्या केल्या रद्द
By सचिन भोसले | Published: December 7, 2022 04:04 PM2022-12-07T16:04:46+5:302022-12-07T16:06:32+5:30
तासाभरातच पुन्हा कोगनोळी पोलिस ठाण्यातून बससेवा पुन्हा बंद कराव्यात, अशी सुचना करण्यात आली
कोल्हापूर : महाराष्ट्र- कर्नाटक सीमावादाचा पुन्हा एकदा भडका उडाल्याने कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र पासिंगच्या वाहनांनावर दगडफेक करून नुकसान करण्यास सुरुवात केली आहे. दगडफेकीच्या या प्रकारानंतर काही काळ बंद झालेली एसटी वाहतूक सुरु झाली मात्र, आज बुधवारी सकाळी पुन्हा ती बंद करण्यात आली. त्यामुळे एस.टी.च्या कोल्हापूर विभागातून जाणाऱ्या ३३० आणि येणाऱ्या ३३० अशा ६६० फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत.
कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील गावांवर दावा केल्यानंतर सीमावादाला तोंड फुटले. यातच काल, मंगळवारी (दि.६) कन्नड रक्षण वेदिकेचे कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र पासिंगच्या वाहनांवर दगडफेक केली. विशेषत: मालवाहतुकीसह एस.टी.महामंडळाच्या बसेसवर दगडफेकीचे प्रकार सुरु आहेत. या पार्श्वभूमीवर कर्नाटकातील कोगनोळी पोलिस ठाण्याच्या सुचनेनूसार मंगळवारी (दि.६) एस.टी.च्या कोल्हापूर विभागाने कर्नाटककडे जाणारी बससेवा बंद केली.
त्यानंतर आज, बुधवारी पहाटे कोगनोळी पोलिसांनी वातावरण शांत झाले असून आपण प्रवाशी सेवा पुर्ववत करू शकता असा संदेश आला. या संदेशानंतर कोल्हापूर विभागाने निपाणी, बेळगावकडे जाणाऱ्या बसेस सुरु केल्या. मात्र, तासाभरातच पुन्हा कोगनोळी पोलिस ठाण्यातून बससेवा पुन्हा बंद कराव्यात, अशी सुचना करण्यात आली. त्यानंतर सकाळी नऊ वाजल्यापासून ही सेवा बंद करण्यात आली. त्यामुळे एस.टी.च्या कोल्हापूर विभागातून रोज कर्नाटककडे ये-जा करणाऱ्या एकूण ६६० फेऱ्या रद्द करण्यात आल्या. अशी माहिती विभागीय वाहतुक नियंत्रक शिवराज जाधव यांनी दिली.