दहावीत सलग आठव्यांदा कोल्हापूर विभाग राज्यात द्वितीय स्थानी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2020 06:37 PM2020-07-29T18:37:06+5:302020-07-29T18:40:22+5:30
दहावीचा निकाल बुधवारी ऑनलाईन जाहीर झाला. त्यामध्ये कोल्हापूर विभागाचा निकाल ९७.६४ टक्के लागला. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा ११.६ टक्क्यांनी निकालात वाढ झाली आहे.
कोल्हापूर : कॉलेज जीवनातील प्रवेशाचा पहिला टप्पा असलेल्या दहावीचा निकाल बुधवारी ऑनलाईन जाहीर झाला. त्यामध्ये कोल्हापूर विभागाचा निकाल ९७.६४ टक्के लागला. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा ११.६ टक्क्यांनी निकालात वाढ झाली आहे. या विभागाने सलग आठव्या वर्षी राज्यातील द्वितीय स्थान कायम राखले आहे. तोंडी परीक्षेचे २० गुण पूर्ववत मिळाल्याने आणि कृतिपत्रिका आधारित प्रश्नपत्रिका असल्याने विद्यार्थ्यांची गुणांची टक्केवारी यंदा पुन्हा वाढली आहे.
राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दुपारी एक वाजता बेस्ट ऑफ फाईव्ह सूत्रानुसार ऑनलाईन निकाल जाहीर केला. त्यानंतर कोल्हापूर विभागाच्या निकालाची माहिती विभागीय सचिव सुरेश आवारी यांनी दिली. कोल्हापूर विभागामध्ये ९८.२१ टक्क्यांसह कोल्हापूर जिल्ह्याने सलग सहाव्या वर्षी प्रथम क्रमांक पटकविला.
सातारा जिल्ह्याने ९७.२५ टक्क्यांसह द्वितीय आणि सांगली जिल्ह्याने ९७.२२ टक्क्यांसह तृतीय क्रमांक मिळविला. या वर्षी कोल्हापूर विभागातील कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यांतील एकूण २२९१ शाळांतील १३३९१७ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यांपैकी १३०७५१ जण उत्तीर्ण झाले. त्यांतील ६९९०० मुले उत्तीर्ण झाली असून, त्यांचे प्रमाण ९६.८३ टक्के आहे. ६०८५१ मुली उत्तीर्ण झाल्या असून, त्यांचे प्रमाण ९८.५८ टक्के इतके आहे. मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण मुलांपेक्षा १.७५ टक्क्यांनी अधिक आहे.
दहावीचा निकाल बेस्ट ऑफ फाईव्हनुसार जाहीर झाला आहे. कोल्हापूर विभागाने राज्यात दुसरा क्रमांक मिळविला आहे. शाळाअंतर्गत गुणांचा फायदा विद्यार्थ्यांनी मिळविला असल्याचे या निकालाच्या टक्केवारीतून दिसून येते. भूगोलचा पेपर रद्द झाल्याने विद्यार्थ्यांना ४४० पैकी सरासरी गुण देण्यात आले आहेत.
- सुरेश आवारी,
सचिव, कोल्हापूर विभाग
जिल्हानिहाय निकाल
- कोल्हापूर : ९८.२१ टक्के
- सातारा : ९७.२५ टक्के
- सांगली : ९७.२२ टक्के
विभागाचा निकाल दृष्टिक्षेपात
- विशेष प्रावीण्य श्रेणीतील उत्तीर्ण विद्यार्थी : ६१३१६
- ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळविलेले विद्यार्थी : १२६५१
- गैरमार्ग प्रकारांबाबत कारवाई झालेले विद्यार्थी : ४५
- पुनर्प्रविष्ट विद्यार्थी उत्तीर्ण : ६७८५
गेल्या चार वर्षांतील विभागाचा निकाल
- २०१९ : ८६.५८ टक्के
- २०१८ : ९३.८८ टक्के
- २०१७ : ९३.५९ टक्के
- २०१६ : ९३.८९ टक्के
गेल्या चार वर्षांतील विभागाचा निकाल
- २०१९ : ८६.५८ टक्के
- २०१८ : ९३.८८ टक्के
- २०१७ : ९३.५९ टक्के
- २०१६ : ९३.८९ टक्के
फटाके वाजवून जल्लोष
कोरोनाची भीती काहीशी बाजूला सारून कोल्हापुरात यशस्वी विद्यार्थ्यांनी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करीत जल्लोष केला. ऑनलाईन निकाल जाहीर झाल्यानंतर फटाके वाजवून विद्यार्थी व त्यांच्या कुटुंबीयांनी आनंद व्यक्त केला. यशस्वी विद्यार्थ्यांवर शिक्षक, कुटुंबीय, नातेवाईक, मित्र-मैत्रिणींनी शुभेच्छांचा वर्षाव केला. साखर-पेढे भरवून अभिनंदन केले.
विभागातील १२५५ शाळा शंभर नंबरी
कोल्हापूर विभागातील २२९१ शाळांपैकी १२५५ शाळांचा निकाल १०० टक्के लागला. ९० टक्क्यांहून अधिक निकाल असलेल्या ८८२ शाळा आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवरील लॉकडाऊनमुळे विद्यार्थ्यांना दहावीच्या गुणपत्रिका मिळण्यास थोडा विलंब होईल, असे आवारी यांनी सांगितले.