एसटीच्या कोल्हापूर विभागात सगळ्याच लालपरी टकाटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2021 04:25 AM2021-08-23T04:25:19+5:302021-08-23T04:25:19+5:30
कोरोना काळात गेल्या अनेक महिन्यांपासून बहुतांश बसेस जागेवरच उभ्या होत्या. अशावेळी बसेसचा दुरुस्ती देखभाल खर्च वाढला. या वाढत्या खर्चाकरिता ...
कोरोना काळात गेल्या अनेक महिन्यांपासून बहुतांश बसेस जागेवरच उभ्या होत्या. अशावेळी बसेसचा दुरुस्ती देखभाल खर्च वाढला. या वाढत्या खर्चाकरिता विभागाकडे पुरेसा निधी नव्हता. मात्र, सरकारने निर्बंध शिथिल केल्यानंतर सेवा पूर्ववत झाली. त्यात काही अंशी दुरुस्ती देखभालीसाठी आगारात असलेल्या बसेसचा भार नियमित सेवा देणाऱ्या बसेसवर पडला. तरीसुद्धा कोल्हापूर विभागाच्या सर्वच अधिकारी व कर्मचाऱ्यांनी प्रवाशांकडून तिकिटापोटी मिळणाऱ्या उत्पन्नाचा ताळमेळ लावत या बसेसही तंदुरुस्त ठेवल्या. विशेष म्हणजे कोल्हापूर आगाराकडे ७५० बसेस आहेत. सर्वच्या सर्व बसेस कार्यशाळेतील कर्मचाऱ्यांनी तंदुुरुस्त ठेवल्या आहेत. त्यामुळे पावसाळा असूनही कुठल्याच मार्गावर गळक्या बसेस वा आसनाचे रेक्झिन फाटलेले अथवा अस्वच्छतेची प्रवाशांकडून एकही तक्रार १२ आगारात दाखल झाली नाही.
गाड्यांचा मेंटेनन्स वाढला, पण पैसा नाही
कोल्हापूर विभागात ७५० हून अधिक बसेस आहेत. त्यापैकी सद्यस्थितीत प्रवाशांच्या प्रतिसादानुसार ५५० हून अधिक बसेस रस्त्यावर धावत आहेत. प्रवाशांकडून मिळणारे उत्पन्न व दुरुस्ती देखभाल खर्च यांचा ताळमेळ या विभागात उत्तम प्रकारे घातला जात आहे. त्यामुळे डिझेल खर्च, वीज बिल आदी बाबींवरील खर्चाचा ताळमेळ घातला जात आहे. ज्या मार्गावर प्रवाशांचा प्रतिसाद मिळत नाही. त्या मार्गावरील बसेसच्या फेऱ्या कमी करणे किंवा त्या मार्गावरील सेवा काही काळासाठी बंद करणे आदी पर्यायांचा अवलंब केला जात आहे. त्यामुळे एस.टी.चा कोल्हापूर विभाग अजून तरी तग धरून आहे.
कोट
एस.टी.च्या कोल्हापूर विभागात प्रवाशांची गैरसोय टाळून तेथील चांगली सेवा कशी देता येईल. यावर भर दिला आहे. एका बसला प्रति कि.मी. २३ ते २४ रुपये इतका डिझेल खर्च आहे. अंदाजे एक बस एक लीटर डिझेलमध्ये ४.३ कि.मी अंतर धावते. या सर्वांचा ताळमेळ घालून दुरुस्ती देखभाल खर्चाची सांगड घातली जाते. त्यामुळे कोल्हापूर विभागातील बसेसही प्रवाशांच्या सेवेकरिता तंदुरुस्त ठेवल्या आहेत.
- शिवराज जाधव, विभागीय वाहतूक अधिकारी, कोल्हापूर
प्रवाशांचा प्रतिक्रिया
राज्याच्या इतर जिल्ह्यांच्या मानाने एस.टी.च्या कोल्हापूर विभागातील बसेस प्रवाशांच्या सोईच्या आहेत. बसण्याचे आसन व्यवस्थित आहेत. कोणत्याही प्रकारची तक्रार करण्यास वाव नाही.
विजय पोवार, प्रवाशी, नागदेववाडी,
कोल्हापूर विभागातील लालपरी बसेस ग्रामीण भागातील प्रवाशांकरिता एक चांगली सोय आहे. बसेसही अगदी तंदुरुस्त आहेत. त्यामुळे प्रवास करताना ग्रामीण भागात कोठेच अडचण नाही.
यशोवर्धन आडनाईक, कोडोली