कोल्हापूर विभागाची आघाडी--महाराष्ट्र केसरी निवड चाचणी तुंगमध्ये
By admin | Published: December 6, 2015 10:32 PM2015-12-06T22:32:43+5:302015-12-07T00:27:34+5:30
राज्य शालेय टेनिस व्हॉलिबॉल स्पर्धा : राज्यातील ३२ संघ सहभागी--सांगलीत बुधवारी चॉकबॉल, तलवारबाजी निवड चाचणी
कुपवाड : राज्य शालेय टेनिस व्हॉलिबॉल क्रीडा स्पर्धेस यशवंतनगर येथील वसंतदादा कुस्ती केंद्रामध्ये उत्साहात प्रारंभ झाला. स्पर्धेत राज्यातून ३२ संघांनी सहभाग घेतला असून उपांत्य फेरीच्या लढतीत कोल्हापूर विभागाने आघाडी घेतली आहे.
स्पर्धेचे उद्घाटन सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष दिलीपतात्या पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी गुलाबराव पाटील मेमोरियल ट्रस्टचे अध्यक्ष पृथ्वीराज पाटील, संग्राम शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष किरण सूर्यवंशी, जिल्हा क्रीडा अधिकारी युवराज नाईक, टेनिस व्हॉलिबॉल फेडरेशनचे सचिव व्यंकटेश वांगवाड, प्राचार्य एम. एन. भैरट, कुस्ती केंद्राचे राहुल नलावडे प्रमुख उपस्थित होते. १७ वर्षांखालील मुलांच्या गटात औरंगाबाद, नाशिक, मुंबई आणि पुण्याच्या संघांनी विजयी घोडदौड सुरू ठेवून उपांत्य फेरीत प्रवेश केला. तसेच १७ वर्षाखालील मुलींच्या गटात मुंबई, नाशिक, कोल्हापूर विभागाच्या संघांनी विजय मिळवित उपांत्य फेरीत प्रवेश केला. १९ वर्षाखालील मुलांच्या गटात औरंगाबाद, कोल्हापूर, पुण्याच्या संघांनी विजय मिळविला. तसेच याच गटातील मुलींच्या मुंबई, कोल्हापूर, नागपूर व पुण्याच्या संघांनी विजयी घोडदौड सुरू ठेवून उपांत्य फेरी गाठली.
सोमवारी स्पर्धेचा समारोप आहे. तसेच ४ ते ६ जानेवारी दरम्यान चंद्रपूर येथे होणाऱ्या राष्ट्रीय टेनिस व्हॉलिबॉल स्पर्धेसाठी याच स्पर्धेतून राज्य संघाची निवड होणार आहे. (वार्ताहर)
महाराष्ट्र केसरी निवड चाचणी तुंगमध्ये
सांगली : नागपूर येथे होणाऱ्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी जिल्ह्यातील मल्लांची निवड चाचणी कुस्ती स्पर्धेच्या आयोजनाचा मान यावर्षी मौजे तुंग (ता. मिरज) यांना देण्यात आला आहे. स्पर्धा ११ व १२ डिसेंबर अशा दोन दिवसात घेण्यात येणार आहेत. ११ डिसेंबर रोजी सकाळी ९ ते १२ पर्यंत वजने घेतली जाणार आहेत.
सांगलीत बुधवारी चॉकबॉल, तलवारबाजी निवड चाचणी
सांगली : चॉकबॉल व तलवारबाजी खेळाच्या जिल्हास्तरीय निवड चाचणी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती संघटनेचे सचिव प्रताप पाटील व शुभम जाधव यांनी दिली.
छत्रपती शिवाजी स्टेडियममध्ये ९ डिसेंबर रोजी सकाळी अकरा वाजता स्पर्धेस प्रारंभ होईल. चॉकबॉल स्पर्धा सिनिअर व ज्युनिअर गटात, तर तलवारबाजी स्पर्धा १३ वर्षाखालील गटात होईल. सांगली डिस्ट्रीक्ट चॉकबॉल असोसिएशन व सांगली अॅमॅच्युअर फेन्सिंग असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.
या निवड चाचणीतून अमरावती येथे होणाऱ्या राज्य चॉकबॉल व नाशिक येथे होणाऱ्या राज्य तलवारबाजी स्पर्धेसाठी सांगली जिल्ह्याचा संघ निवडण्यात येणार आहे.
स्पर्धेचे उद्घाटन अॅड. एस. एम. पखाली व डॉ. बाळकृष्ण चैतन्य यांच्या हस्ते होणार आहे. (क्रीडा प्रतिनिधी)