कोल्हापूर : ग्रामीण रुग्णालयात मिळणार दिव्यांग प्रमाणपत्रे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2018 12:34 AM2018-09-26T00:34:32+5:302018-09-26T00:40:41+5:30
केवळ जिल्हा रुग्णालयातूनच देण्यात येणारी दिव्यांग प्रमाणपत्रे आता उपजिल्हा, ग्रामीण रुग्णालयांमधूनही मिळणार आहेत.
समीर देशपांडे ।
कोल्हापूर : केवळ जिल्हा रुग्णालयातूनच देण्यात येणारी दिव्यांग प्रमाणपत्रे आता उपजिल्हा, ग्रामीण रुग्णालयांमधूनही मिळणार आहेत. शासनाच्या आरोग्य विभागाने यामध्ये सुलभता आणल्याने आता दिव्यांग प्रमाणपत्रे तपासणीनंतर त्वरित आणि गावाजवळच्या रुग्णालयात मिळणार आहेत.
आरोग्य विभागाच्या वतीने ३ डिसेंबर २0१२ पासून एसएडीएम या संगणकीय प्रणालीद्वारे केवळ सहा प्रकारच्या दिव्यांग प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात येत असे. मात्र, केंद्र शासनाने २८ डिसेंबर २0१६ रोजी ‘दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम २0१६’ संमत केल्याने आता २१ दिव्यांग प्रकारांचा यामध्ये समावेश करण्यात आला आहे.
मात्र, अशा प्रकारची प्रमाणपत्रे केवळ जिल्हा रुग्णालयामध्येच दिली जात.
पहिल्यांदा तपासणीसाठी, नंतर प्रमाणपत्रासाठी जिल्ह्याला फेऱ्या माराव्या लागत असत. त्यासाठी पैसा आणि वेळ दोन्ही खर्च होत होते.यामध्ये आता शासनाने सुधारणा केली असून, आता तपासणी आणि प्रमाणपत्र प्रदान करण्याचे अधिकार उपजिल्हा / ग्रामीण रुग्णालय, शासकीय / महानगरपालिका वैद्यकीय महाविद्यालय, महानगरपालिका रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक, अधिष्ठाता यांनाही दिले आहेत. त्यामुळे आता यापुढे
दिव्यांगांना त्यांचे गाव ज्या रुग्णालयाच्या कार्यक्षेत्रात आहे, अशा ग्रामीण रुग्णालयात तपासणीसाठी जावे लागणार असून, तेथूनच त्यांना प्रमाणपत्रही दिले जाणार आहे. प्रत्येक रुग्णालयामध्ये यासाठी तीनसदस्यीय समिती राहणार असून, यांच्यामार्फतच ते प्रमाणपत्र देण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. सध्या सर्व दिव्यांगांची तपासणी आणि त्यांना प्रमाणपत्र देण्याचा भार एकाच जिल्हा रुग्णालयावर दिला गेल्याने यासाठी विलंब होत होता. मात्र, शासनाने ही सुधारणा केल्याने प्रमाणपत्र मिळविणे सुलभ होणार आहे.
यांना मिळणार प्रमाणपत्रे
या योजनेतून २१ प्रकारच्या दिव्यांग व्यक्तींना लाभ दिला जाणार आहे. शासनाच्या जुन्या नियमानुसार अंध, बहिरे, मुके, हात, पायाने दिव्यांग, स्वमग्न अशा काही मोजक्या वर्गांतील दिव्यांगांचा समावेश केला जात असे. मात्र, आता केंद्र शासनाने नव्याने काही प्रकारांचा समावेश केला आहे. त्यानुसार पूर्णत: अंध, अंशत: अंध, कर्णबधिर, वाचादोष, अस्थिव्यंग, मानसिक आजार, अध्ययन अक्षम, मेंदूचा पक्षाघात, स्वमग्न, बहुविकलांग, कुष्ठरोग, बुटकेपणा, बौद्धिक अक्षमता, मांसपेशीय क्षरण, मज्जासंस्थेचे तीव्र आजार, मल्टिपल स्केलेरोसिस, थॅलसेमिया, अधिक रक्तस्राव, सिकल सेल, अॅसिड अटॅक, कंपवात रोग हे प्रकार यामध्ये समाविष्ट आहेत.