कोल्हापूर :दिवाळीची लगबग सुरू, बाजारपेठेत साहित्याची मांडणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2018 01:50 PM2018-10-25T13:50:59+5:302018-10-25T13:52:47+5:30
नवरात्रौत्सवाच्या धामधुमीतून काही दिवसांची उसंत घेतल्यानंतर आता सर्वांना दिवाळीचे वेध लागले आहेत. वर्षातील या सर्वांत मोठ्या सणानिमित्त बाजारपेठेत आकर्षक आकाशकंदील, पणत्या, कपडे, फराळाचे साहित्य अशा अनेकविध वस्तूंची आवक झाली आहे.
कोल्हापूर : नवरात्रौत्सवाच्या धामधुमीतून काही दिवसांची उसंत घेतल्यानंतर आता सर्वांना दिवाळीचे वेध लागले आहेत. वर्षातील या सर्वांत मोठ्या सणानिमित्त बाजारपेठेत आकर्षक आकाशकंदील, पणत्या, कपडे, फराळाचे साहित्य अशा अनेकविध वस्तूंची आवक झाली आहे.
दिवाळीचा सण मोठा, नाही आनंदाला तोटा... असे म्हणतात; म्हणूनच हा सण जल्लोषात साजरा करण्यासाठी वर्षभर प्लॅनिंग केले जाते. नवरात्रौत्सव नुकताच संपल्याने चार दिवसांची उसंत घेतल्यानंतर आता घरोघरी दिवाळीच्या तयारीची लगबग सुरू झाली आहे.
फराळ म्हणजे दिवाळीचा अविभाज्य घटक. हे पदार्थ बनविण्यासाठी महिलांचा आठवडा जातो; त्यामुळे दिवाळी खरेदीची सुरुवात धान्य व फराळाच्या साहित्याने केली जाते. हरभराडाळ, तांदूळ, दाळे, मैदा, साखर, ड्रायफ्रुट, तेल, चिवड्यासाठी विविध प्रकारचे चिरमुरे या साहित्याची खरेदी केली जात आहे. त्यामुळे लक्ष्मीपुरीसह किराणा व भुसार मालाच्या दुकानात ग्राहकांची गर्दी होत आहे.
भिशी, रिकरिंग, बोनसची भर
दिवाळीसाठी अनेक महिला भिशी योजनेत पैसे गुंतवतात, नोकरदार रिकरिंगवर भर देतात; शिवाय सर्वच आस्थापनांमधील कर्मचाऱ्यांना बोनस दिला जातो. यंदा दिवाळी नोव्हेंबरच्या सुरुवातीलाच असल्याने भिशी, रिकरिंग आणि बोनसचे जास्तीचे पैसे हाती येत असल्याने दिवाळीला आर्थिक चणचण भासत नाही.
डिझायनर पणत्यांची क्रेझ
पूर्वी केवळ मातीपासून बनविलेल्या पणत्या दारात लावल्या जायच्या. आता त्याला सुरेख रंग, लेस, कुंदनसह आकर्षक डिझाईन केली जाते. ग्राहकांची आवड व आॅर्डरनुसार पणत्या बनवून दिल्या जातात. याशिवाय लक्ष्मीपूजनाच्या समोर, रांगोळीवर ठेवण्यासाठी मोठ्या आकाराचे दिवे लावले जातात. त्यामुळे महाद्वार रोड, कुंभार गल्ल्यांमध्ये मांडलेल्या या पणत्या लक्ष वेधून घेत आहेत.
कपड्यांची खरेदी
ऐन दिवाळीच्या तोंडावर कपडे खरेदीला गेले की गर्दीमुळे निवडीला वाव राहत नाही. काहीवेळा कपड्यांची निवड चुकते; त्यामुळे सणाच्या आधीच कपड्यांची खरेदी आटोपून घेतली जाते. मोठ्यांसह लहान मुलांसाठीही नावीन्यपूर्ण फॅशनचे कपडे बाजारात आले आहेत. या खरेदीसाठी महाद्वार रोड, ताराबाई रोड, भाऊसिंगजी रोड, राजारामपुरी, लुगडी ओळ, गांधीनगर या ठिकाणी दुपारनंतर ग्राहकांची गर्दी होत आहे.