कोल्हापूर : ‘मानधन नको, वेतन द्या’, आरोग्य परिचरांचा जिल्हा परिषदेवर मोर्चा : द्वारसभेवेळी निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2018 05:23 PM2018-06-11T17:23:33+5:302018-06-11T17:23:33+5:30
‘मानधन नको, वेतन द्या, सेवेत कायम करा’ अशा घोषणा देत सोमवारी करवीर कामगार संघाच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर जिल्हा आरोग्य परिचर संघटनेच्यावतीने जिल्हा परिषदेवर मोर्चा काढून निदर्शने केली. मोर्चाच्या शिष्टमंडळाने आरोग्याधिकारी कुंभार यांना निवेदन दिले.
कोल्हापूर : ‘मानधन नको, वेतन द्या, सेवेत कायम करा’ अशा घोषणा देत सोमवारी करवीर कामगार संघाच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर जिल्हा आरोग्य परिचर संघटनेच्यावतीने जिल्हा परिषदेवर मोर्चा काढून निदर्शने केली. मोर्चाच्या शिष्टमंडळाने आरोग्याधिकारी कुंभार यांना निवेदन दिले.
ग्रामीण भागातील जनतेला आरोग्य सेवा त्यांच्या राहण्याच्या ठिकाणी मिळावी म्हणून जिल्हा परिषदेमार्फत खेडोपाडी आरोग्य केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत. या केंद्रांमध्ये गेली ३० ते ४० वर्षे आरोग्य परिचर नि:स्वार्थी व प्रामाणिकपणे अत्यंत तुटपुंज्या मानधनावर काम करीत आहेत. या विभागात काम करणाऱ्या महिला या गरीब, परितक्त्या भूमिहीन व शेतमजूर आहेत. सध्या त्यांना दरमहा अवघे १२०० रुपये मानधन दिले जाते.
या तुटपुंज्या मानधनामध्ये शासकीय परिपत्रकाप्रमाणे सुमारे ६००० रुपयांपर्यंत वाढ करावी तसेच त्याचे वेतनात रूपांतर करावे, सेवेत कायम करावे, ७ जानेवारी २०१७ च्या परिपत्रकाची अंमलबजावणी करावी, मानधनाची रक्कम थेट बँकेत जमा करावी, लसीकरणाबाबत सक्ती करू नये, आदी मागण्यांसाठी करवीर कामगार संघाच्या नेतृत्वाखाली जिल्हा आरोग्य परिचर संघटनेच्यावतीने मोर्चा काढण्यात आला.
येथील महावीर उद्यानापासून मोर्चाला प्रारंभ झाला. हातात लाल निशाण घेऊन महिला मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी झाल्या होत्या. मोर्चा जिल्हा परिषदेवर पोहोचल्यानंतर तेथे प्रवेशद्वारसभा घेण्यात आली.
यावेळी आरोग्य परिचर संघटनेचे अध्यक्ष बाबा यादव, दिलीप पवार, अॅड. बाळासाहेब पोवार यांनी भाषणात आरोग्य परिचरांच्या मागण्यांबाबत व्यथा मांडताना शासनाचा निषेध केला. त्यानंतर आरोग्याधिकारी कुंभार यांना शिष्टमंडळातर्फे निवेदन देण्यात आले.
शिष्टमंडळात दिलीप पवार, सुशीला यादव, एस. बी. पाटील, अॅड. बाळासाहेब पोवार, एम. बी. पडवळे, भगवान यादव, निर्मला श्ािंदे, सुमन कुंभार, बाळाबाई कांबळे, सुमित्रा कडचे, रत्नाबाई शिंदे, निर्मला परीट, रेश्मा नाईकवडी, आदींचा सहभाग होता.
वाढीव मानधनाचा निर्णय अंतिम टप्प्यात
मोर्चाच्या शिष्टमंडळाने आरोग्याधिकारी कुंभार यांच्याशी चर्चा केली असता आरोग्य परिचरांचे वर्षाचे पैसे शासनाकडून आले आहेत, ते लवकरच खात्यावर वर्ग करू, तसेच मानधनची रक्कम १२०० रुपयांवरून ६००० करण्याच्या मागणीवर निर्णय अंतिम टप्प्यात आहे, तोही निर्णय लवकरच होईल, असे कुंभार यांनी शिष्टमंडळास आश्वासन दिले.