कोल्हापूरची श्रुती नागालँडमध्ये देतेय पर्यावरणाचे धडे, नागालँडचा परिसर हिमालयीन इको सिस्टिमचा भाग
By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2022 11:53 AM2022-10-08T11:53:42+5:302022-10-08T11:54:05+5:30
भारतीय ॲग्रो इंडस्ट्री फौंडेशन म्हणजेच बायफच्या माध्यमातून त्यांनी पर्यावरणविषयक जनजागरणासाठी काम सुरू केलं.
समीर देशपांडे
कोल्हापूर: लहानपणी सात, आठ वर्षाच्या श्रुतीला एका चिंचोक्यापासून इतकं मोठं झाड कसं तयार होतं. इतक्या कशा चिंचा लागतात, असा प्रश्न पडला. घरच्यांसोबत खूप ठिकाणी फिरताना पशू, पक्षी, प्राणी, झाडं याबद्दल तिला औत्सुक्य वाटू लागलं. यातूनच तिची निसर्ग आणि पर्यावरणाविषयीची आवड वाढत गेली. हीच कोल्हापूरची डॉ. श्रुती भास्कर कुलकर्णी आता नागालँडमध्ये पर्यावरणाचे धडे देत आहे. तपोवन, हंदुमती गर्ल्स हायस्कूल, पदमाराजे ज्युनिअर कॉलेज, न्यू कॉलेज, शिवाजी विद्यापीठ आणि पुणे विद्यापीठ असा शैक्षणिक प्रवास करणाऱ्या श्रुती शिवाजी पेठेतील आठ नंबर शाळेजवळ राहणाऱ्या. वडील भास्कर हे आयटीआयमध्ये इन्स्ट्रक्टर होते. ते निवृत्त झाले, तर आई भाग्यश्री गृहिणी.
या कुटुंबाला फिरायची खूप आवड. त्यामुळे हीच भ्रमंती करताना श्रुतीला पडणाऱ्या अनेक प्रश्नांची उत्तरे आईवडील देत गेले. यातून तिला पर्यावरणाची आवड निर्माण झाली. अशातच ती कॉलेजला असताना कोल्हापूरचेच निसर्ग अभ्यासक सुहास वायंगणकर यांचा एक स्लाईड शो तिने पाहिला आणि मग ठरवलं की, आपण यातच पुढचं शिक्षण करायचं.
शिवाजी विद्यापीठातून पदव्युत्तर शिक्षण घेतल्यानंतर श्रुती यांनी दोन वर्षे राजाराम कॉलेजवर अध्यापनही केलं. यानंतर भारतीय ॲग्रो इंडस्ट्री फौंडेशन म्हणजेच बायफच्या माध्यमातून त्यांनी पर्यावरणविषयक जनजागरणासाठी काम सुरू केलं. फेलोशिपच्या माध्यमातून ठाणे जिल्ह्यातील आदिवासी पाड्यापासून इतरही राज्यांमध्ये त्यांची भटकंती सुरू झाली. पुणे पर्यावरण शिक्षण केंद्राच्या माध्यमातूनही त्या कार्यरत राहिल्या. गेल्यावर्षी त्यांनी पुणे विद्यापीठातून पीएच. डी. पदवीही संपादन केली. ‘पक्षी आणि फुलपाखरांवर होणारा वातावरण बदलाचा परिणाम आणि कळू शकणारे धोके’ असा त्यांच्या प्रबंधाचा विषय होता. याच दरम्यान नागालँडमधील सर्व म्हणजे १६ जिल्ह्यांमध्ये मॉडेल स्कूल उभारण्याचा निर्णय शासनाने घेतला. जागतिक बँकेच्या निधीतून हा प्रकल्प गेल्या वर्षीपासून सुरू झाला आहे. या प्रकल्पावर सध्या श्रुती या काम करत आहेत.
पर्यावरणाबाबत जनजागरण
सध्या डॉ. श्रुती या कोहिमा येथे वास्तव्यास आहेत. या १६ जिल्ह्यातील शाळांमध्ये पर्यावरणविषयक मॉडेल्सची उभारणी, या शाळांमधील शिक्षक आणि शालेय शिक्षण समित्यांचे सदस्य यांच्यामध्ये पर्यावरणविषयक संवेदनशीलता निर्माण करण्याचे काम त्या करतात.. नागालँडचा हा परिसर हिमालयीन इको सिस्टिमचा भाग असल्यामुळे वातावरणातील बदलाचे परिणाम या ठिकाणी अटळ असल्याने येथील पर्यावरणाचा सातत्याने अभ्यास करण्याची गरज आहे. त्यानुसारच सध्या हा प्रकल्प सुरू आहे.
थोडं वेगळ्या क्षेत्रात काम करण्याची आवड माझ्यामध्ये निर्माण झाली. फेलोशिपच्या माध्यमातून अनेक राज्यांमध्ये फिरायला जाणे असो किंवा आताही नागालँडमध्ये येणे असो. एक मुलगी म्हणून माझ्याबाबतीत वेगळा विचार केला जातो. जरी तो काळजीपोटी केला जात असला तरी देखील माझ्या आवडीच्या क्षेत्रात काम करण्याचं एक मोठं समाधान आहे. - श्रुती कुलकर्णी