कोल्हापूर : केशवरावांचे चित्र काढणार, पुतळ्याचेही नियोजन, ‘लोकमत’च्या वृत्ताची दखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2018 11:20 AM2018-06-20T11:20:25+5:302018-06-20T11:20:25+5:30
संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहात छतावर लावण्यात आलेले केशवरावांचे चित्र महापालिकेकडून काढण्यात येणार आहे. नाट्यगृहाच्या पुढील टप्प्यातील विकास आराखड्याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधला असून, त्याअंतर्गत केशवरावांच्याही पुतळ्याचा समावेश केला जाईल, अशी माहिती महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी मंगळवारी ‘लोकमत’ला दिली.
कोल्हापूर : संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहात छतावर लावण्यात आलेले केशवरावांचे चित्र महापालिकेकडून काढण्यात येणार आहे. नाट्यगृहाच्या पुढील टप्प्यातील विकास आराखड्याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधला असून, त्याअंतर्गत केशवरावांच्याही पुतळ्याचा समावेश केला जाईल, अशी माहिती महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी मंगळवारी ‘लोकमत’ला दिली.
‘केशवरावचा प्रस्ताव रेंगाळला’ या मथळ्याखाली रविवारी (दि. १७) ‘लोकमत’मध्ये केशवराव भोसले नाट्यगृहाच्या पहिल्या टप्प्यानंतरची स्थिती व त्यातील त्रुटी मांडण्यात आल्या होत्या. त्यांत केशवराव भोसलेंचे छतावर अडकविलेले चित्र, नियोजनात केशवरावांची माहिती व पुतळ्याचा समावेश नसल्याचे मांडण्यात आले होते.
दरम्यान, रंगकर्मींनीही दूरध्वनीद्वारे आम्ही महापालिकेकडे याविषयी वारंवार चर्चा केली आहे. मात्र प्रतिसाद आला नसल्याचे सांगितले.
मंगळवारी याविषयी महापालिकेच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी केशवराव भोसलेंचे छतावर अडकविलेले चित्र काढणार असल्याचे सांगितले. वास्तूच्या अंतर्गत डिझाईनमध्ये हे चित्र लावण्यासाठी सुयोग्य जागा नसल्याने ते छतावर लावण्यात आले.
ते खूप उंच असल्याने चित्र काढण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा मागवावी लागणार आहे; त्यामुळे शक्य तितक्या लवकर चित्र काढून दर्शनी भागात लावले जाईल. नाट्यगृहाच्या दुसऱ्या टप्प्यातील आराखड्यात पुतळ्यांचे एकत्रीकरण व सुशोभीकरणाचा प्रस्ताव आहे. त्यात केशवरावांच्या पुतळ्याचा समावेश केला जाईल, अशी माहिती प्रकल्प अधिकाऱ्यांनी दिली. दुसऱ्या टप्प्यातील नूतनीकरणाच्या प्रस्तावाबाबतही जिल्हाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधण्यात आला आहे.