कोल्हापूर : पॉस मशीन बंदमुळे रेशन ग्राहकांना मनस्ताप, तब्बल अर्धा दिवस सर्व्हर डाऊन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2018 11:38 AM2018-11-06T11:38:29+5:302018-11-06T11:47:22+5:30
दिवाळीच्या आदल्या दिवशीच ई-पॉस बंद राहिल्याने रेशन ग्राहकांना मनस्ताप सहन करावा लागला. सर्व्हर डाऊनमुळे अर्धा दिवस ग्राहकांना रेशन दुकानांसमोर धान्य घेण्यासाठी ताटकळत उभे राहावे लागले. तांत्रिक बिघाडामुळे शहरासह गावा-गावांमधील ग्राहकांची ससेहोलपट झाली. याबाबत तीव्र प्रतिक्रिया उमटल्या.
कोल्हापूर : दिवाळीच्या आदल्या दिवशीच ई-पॉस बंद राहिल्याने रेशन ग्राहकांना मनस्ताप सहन करावा लागला. सर्व्हर डाऊनमुळे अर्धा दिवस ग्राहकांना रेशन दुकानांसमोर धान्य घेण्यासाठी ताटकळत उभे राहावे लागले. तांत्रिक बिघाडामुळे शहरासह गावा-गावांमधील ग्राहकांची ससेहोलपट झाली. याबाबत तीव्र प्रतिक्रिया उमटल्या.
दिवाळी बुधवारी असल्याने घराघरांत फराळ करण्याचे काम सुरू आहे. रेशनवर गहू, तूरडाळ, तांदूळ व साखर मिळत असल्याने ते घेण्यासाठी गेल्या दोन-चार दिवसांपासून दुकानांसमोर रांगा लागल्या आहेत; परंतु सोमवारी सकाळपासून रेशन दुकानांमधील ई-पॉस मशीन बंद असल्याचे दुकानदारांच्या लक्षात आले. सर्वच व्यवहार या मशीनवर असल्याने ते सुरू झाल्याशिवाय धान्य वितरण करणे शक्य नाही. दुकानात धान्य आहे परंतु ते वाटप करता येत नाही, अशी स्थिती निर्माण झाली.
सर्व्हर डाऊनमुळे ई-पॉस मशीनवर अशाप्रकारे तांत्रिक अडथळ्यांचा संदेश येत होता.
अधिक माहिती घेतल्यानंतर ई पॉस मशीनचा सर्व्हर डाऊन झाल्याचे समजले. काहीवेळांतच तो पूर्ववत होईल अशी अपेक्षा होती. त्यामुळे दुकानांसमोर ग्राहकांच्या रांगा कायम होत्या. दुपारपर्यंत ही मशीन बंद राहीली. ऐन दिवाळीत शासनाच्या या गलथानपणाबद्दल ग्राहकांमधून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. आम्ही फराळ कधी करायचा, किती वेळ थांबायचे, अशा भावना महिला ग्राहकांनी व्यक्त केल्या. सरकारबरोबरच सर्व रोष दुकानदारांवर व्यक्त होत होता.
यावर आम्हाला धान्य द्यायला काहीच अडचण नाही, परंतु सर्व्हर डाऊनमुळे मशीन बंद असल्याने ते देता येत नसल्याचे दुकानदांकडून सांगण्यात येत होते. हे सांगत असताना त्यांची चांगलीच कसरत होत होती. अखेर दुपारनंतर ही मशीन पूर्ववत सुरू झाल्याने धान्य वितरणास सुरुवात झाली. धान्य घेण्यासाठी अर्धा दिवस ताटकळत थांबलेल्या ग्राहकांच्या रांगा सायंकाळपर्यंत कायम राहिल्या.