कोल्हापूर : बटाटा झाला दुप्पट; डाळिंब, बोरांची आवक वाढली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2018 11:48 AM2018-12-24T11:48:25+5:302018-12-24T11:50:16+5:30
बटाटा आणि भाज्यांची आवक कमी झाल्याने त्याचा परिणाम दरांवर झाला आहे. बटाटा दुपटीने वाढला असून, घाऊक बाजारात तो १० किलोंना १४० रुपये, तर किरकोळ बाजारात २०० रुपये असा होता. दुसरीकडे, डाळिंब, बोरांची आवक वाढली आहे; तर हरभरा, अननस रविवारच्या आठवडी बाजारात दाखल झाला आहे.
कोल्हापूर : बटाटा आणि भाज्यांची आवक कमी झाल्याने त्याचा परिणाम दरांवर झाला आहे. बटाटा दुपटीने वाढला असून, घाऊक बाजारात तो १० किलोंना १४० रुपये, तर किरकोळ बाजारात २०० रुपये असा होता. दुसरीकडे, डाळिंब, बोरांची आवक वाढली आहे; तर हरभरा, अननस रविवारच्या आठवडी बाजारात दाखल झाला आहे.
हरभऱ्याचा डहाळा १०० रुपयांना, तर अननस ३० ते ४० रुपयांच्या घरात होता. ‘भोगी’साठी लागणारे राळ्याचे तांदूळ बाजारात आले असून, यंदा पीक कमी आल्याने परिणामी दर वाढला आहे. प्रतिकिलो तो ८० पासून १०० रुपयांपर्यंत आहे. गतवर्षी तो ६० रुपये होता. त्याला आता मागणी वाढली आहे.
सौंदत्ती यात्रा झाल्यामुळे आठवडी बाजारात ग्राहकांची फारशी गर्दी दिसत नव्हती. गेल्या आठवड्यापेक्षा या आठवड्यात काही भाज्यांचे दर वाढले आहेत. कांदा प्रतिकिलो एक रुपयाने कमी झाला असून, तो आठ रुपयांच्या घरात आला आहे. तसेच लसणाच्या दरात घसरण झाली आहे.
लसूण प्रतिकिला १२ रुपये होता. तो गेल्या आठवड्यात १५ रुपये होता. वांगी, ओली मिरची, ढबू मिरची, भेंडी, दोडका, गवार, फ्लॉवर, कोथिंबिरीच्या पेंढीच्या दरात वाढ झाली आहे. कोथिंबिरीच्या पेंढीमागे चार रुपये वाढले आहेत. मात्र मेथी, पालक, पोकळा, शेपू, कोबी, टोमॅटो, घेवड्याचे दर ‘जैसे थे’ होते.
याचबरोबर डाळिंब व बोरांची आवक वाढली आहे. घाऊक बाजारात डाळिंब प्रतिकिलो ३३, तर बोरे १३ रुपये झाली आहेत. मोसंबी, माल्टा यांचे दर स्थिर आहेत. गुळाच्या रव्यांचा दर स्थिर होता. एक किलोच्या बॉक्सचा ३५०० रुपये दर होता. दरम्यान, ओल्या वाटाण्याची आवक वाढल्याने त्याचा दरावर परिणाम झाला आहे. घाऊक बाजारात ओल्या वाटाण्याचा दर २२५ रुपये असा होता. तो गेल्या आठवड्यात ३१० रुपये असा होता.
गहू दोन; तांदूळ चारने वाढला
बासमतीसह विविध प्रकारच्या तांदळाच्या दरात प्रतिकिलो चार रुपयांनी वाढ झाली आहे. बासमती ४० रुपयांवरून ४४ रुपये, ४८ वरून ५२ रुपये; तर गव्हाच्या दरात दोन रुपयांनी वाढ झाली. बन्सी गहू २८ रुपये असा झाला. सरकी, शेंगतेल, सुक्या खोबऱ्याचे दर स्थिर आहेत.
बाजरी, तीळ वाढले
बाजरी २४ रुपयांवरून २८ रुपये; तर तिळाच्या दरात तब्बल ६० रुपयांनी वाढ होऊन १८० रुपये प्रतिकिलो झाले आहे. तसेच ड्रायफुटच्या दरात कोणतीही वाढ झालेली नाही.