कोल्हापूर : कुलगुरूंकडून गैरव्यवहारांचे प्रमाद, आर्थिक उधळपट्टी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2019 01:03 PM2019-01-11T13:03:35+5:302019-01-11T13:06:46+5:30
निष्क्रियता, गैरव्यवहारांचे असंख्य प्रमाद, बेकायदेशीर कारभार, शिक्षकांवर अन्याय, विद्यार्थिहिताकडे दुर्लक्ष, आर्थिक उधळपट्टी, अधिकार मंडळांवर अतिक्रमण असे विविध आरोप शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्यावर शिवाजी विद्यापीठ शिक्षक संघा (सुटा)ने केले आहेत. कुलगुरूंच्या प्रमादांची, गैर व भ्रष्ट कारभाराची चौकशी करावी, या मागणीसाठी ‘सुटा’ने आंदोलन सुरू केले.
कोल्हापूर : निष्क्रियता, गैरव्यवहारांचे असंख्य प्रमाद, बेकायदेशीर कारभार, शिक्षकांवर अन्याय, विद्यार्थिहिताकडे दुर्लक्ष, आर्थिक उधळपट्टी, अधिकार मंडळांवर अतिक्रमण असे विविध आरोप शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्यावर शिवाजी विद्यापीठ शिक्षक संघा (सुटा)ने केले आहेत. कुलगुरूंच्या प्रमादांची, गैर व भ्रष्ट कारभाराची चौकशी करावी, या मागणीसाठी ‘सुटा’ने आंदोलन सुरू केले.
‘सुटा’च्या कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये कुलगुरूंच्या दोन वर्षांतील गैर, भ्रष्ट व बेकायदेशीर, नियमबाह्य कारभाराची सविस्तर चर्चा झाली. त्यांच्या कारभाराची सुमारे ८० प्रकरणे असून, त्यांची यादी तयार करण्यात आली आहे. या गैरव्यवहारांबाबत कुलगुरूंना ‘सुटा’ने अनेक पत्रे, निवेदने दिली. त्यांच्यासमवेत ‘सुटा’च्या पदाधिकाऱ्यांनी अनेक वेळा चर्चा केली; परंतु, कुलगुरूंच्या कारभारात सुधारणा होण्याऐवजी गैरव्यवहारांचे प्रमाण वाढले. अनेक गैर प्रकरणांबाबत कारवाईचे आश्वासन देऊनही ती करण्यात आली नाही.
गैरव्यवहार झाल्याचे मान्य करूनही अपेक्षित कारवाई करण्याबाबत कुलगुरूंची निष्क्रियता, उदासीनता स्पष्ट झाली. गेल्या महिन्यातील शेवटच्या आठवड्यात कुलगुरूंसमवेत ‘सुटा’च्या पदाधिकाऱ्यांची चर्चा झाली. त्यावेळी आंदोलनाबाबत अप्रत्यक्ष इशारा देण्यात आला होता. त्यावेळी कुलगुरूंनी कारवाईचे कोणतेही आश्वासन दिले नाही; त्यामुळे ‘सुटा’ला आंदोलनाचा निर्णय घ्यावा लागला. त्यानुसार आंदोलन सुरू केले आहे.
पहिल्या टप्प्यात प्राध्यापकांच्या सह्यांची मोहीम राबवून कुलपतींना निवेदन देण्यात येणार आहे. कुलगुरूंच्या कारभाराची उच्च न्यायालयाच्या सेवानिवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी करावी. विद्यापीठाचे झालेले आर्थिक नुकसान वसूल करण्यात यावे, अशी मागणी या निवेदनाद्वारे केली जाणार आहे, अशी माहिती ‘सुटा’चे प्रमुख कार्यवाह प्रा. डी. एन. पाटील यांनी पत्रकाद्वारे दिली. दरम्यान, याबाबत कुलगुरू डॉ. शिंदे यांची प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी त्यांच्या मोबाईलवर संपर्क साधला असता त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही.
‘सुटा’ने कुलगुरूंचे मांडलेले ठळक प्रमाद
- गैरव्यवहारांचे आरोप असलेल्या प्राचार्यांची वर्णी
- अभ्यासमंडळांवर अपात्र प्राध्यापकांचे नामनिर्देशन
- सदोष पदवी प्रमाणपत्रांची छपाई प्रकरण
- शैक्षणिक सल्लागाराची नियमित कार्यपद्धती धाब्यावर बसवून बेकायदेशीर नेमणूक
- कुलगुरू निवासात स्वतंत्र कार्यालयाची नियमबाह्य, मनमानी स्थापना
- वार्षिक अंदाजपत्रकाबाबत तरतुदींचा भंग
- स्वत:ची, कुलगुरुपदाची अप्रतिष्ठा
- ‘सुटा’ने उपस्थित केलेले प्रश्न, प्रकरणांबाबत चुकीचा, अपूर्ण खुलासा
- प्राचार्यांच्या निवडीस मान्यता देण्याबाबत पक्षपात करणे
- स्वत:चे प्रोफाईल समृद्ध करण्यावर भर
- अभ्यासमंडळांवरील स्वीकृत सदस्यांचा घोळ.
आंदोलनाचे टप्पे
- २२ जानेवारी : महाविद्यालयांतील प्राध्यापकांनी काळ्या फिती लावून काम
- २९ जानेवारी : दुपारी तीन वाजताविद्यापीठासमोर निदर्शने
- १२ फेब्रुवारी : दुपारी एक वाजता.विद्यापीठात धरणे आंदोलन