कोल्हापूर : राजू शेट्टींच्या निष्क्रियतेमुळेच पाणीसंघर्ष - धैर्यशील माने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2018 05:55 PM2018-05-19T17:55:58+5:302018-05-19T17:55:58+5:30
पंचगंगा प्रदूषण निर्मूलनासाठी खासदार राजू शेट्टी यांनी केंद्र सरकारच्या पातळीवर जे प्रयत्न करणे अपेक्षित होते, ते न केल्यानेच ‘वारणा’, ‘पंचगंगा’ नद्यांतील पाण्याचा संघर्ष पेटल्याची टीका जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धैर्यशील माने यांनी पत्रकातून केली आहे.
कोल्हापूर : पंचगंगा प्रदूषण निर्मूलनासाठी खासदार राजू शेट्टी यांनी केंद्र सरकारच्या पातळीवर जे प्रयत्न करणे अपेक्षित होते, ते न केल्यानेच ‘वारणा’, ‘पंचगंगा’ नद्यांतील पाण्याचा संघर्ष पेटल्याची टीका जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धैर्यशील माने यांनी केली आहे.
पंचगंगेतील दूषित पाण्याने हातकणंगले, शिरोळ तालुक्यांतील अनेकांचे जीव घेतले आहेत. दूषित पाण्यात मिसळणाऱ्या रसायनांमुळे त्वचारोग, कॅन्सर आजाराने ग्रासले आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळ व शासकीय यंत्रणेने वेळीच उपाययोजना केली असती तर लोकांच्या जिवाशी खेळ झाला नसता.
जिल्हा परिषदेने २४ फेबु्रवारी २०१४ रोजी ३० गावांचा सांडपाणी व सहा गावांचा घनकचरा व्यवस्थापनाचा १०८ कोटींचा प्रकल्प अहवाल राज्य सरकारकडे पाठविला होता. पर्यावरण विभागाने शिफारशीसह नोव्हेंबर २०१४ मध्ये राष्ट्रीय नदी संवर्धन संचालनालय वने व पर्यावरण विभाग, नवी दिल्ली यांच्याकडे पाठविला.
तो वेगवेगळी कारणे दाखवून नाकारण्यात आला. पंचगंगा प्रदूषण व उपाययोजनेबाबत केंद्र सरकारच्या पातळीवर खासदार म्हणून ताकदीने प्रयत्न होणे गरजेचे होते, ते राजू शेट्टी यांनी केलेच नाहीत. जिल्हा परिषदेने पाठविलेला प्रस्ताव मंजूर करून निधी आणला असता तर आज पाण्यासाठी ‘ग्रामीण विरुद्ध शहरी’ असा संघर्ष झाला नसता, असेही धैर्यशील माने यांनी म्हटले आहे.