कोल्हापूर : डिझेल दरवाढीमुळे जिल्ह्यातील ५० टक्के आयात-निर्यात थांबली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2018 10:50 AM2018-04-26T10:50:50+5:302018-04-26T10:50:50+5:30
डिझेलच्या किमती झपाट्याने वाढल्याने वाहतूक खर्चातही वाढ होत आहे. त्यामुळे आयात व निर्यात मालवाहतुकीवर ५० टक्के परिणाम झाला आहे. परिणामी डिझेल दरवाढीचा झटका बसल्याने महागाईची शक्यता बाजारपेठेतून व्यक्त होत आहे. त्यातच टोल टॅक्स, वाहन विमा हप्त्यांमध्येही कमालीची वाढ केल्याने ट्रक व्यवसाय मेटाकुटीला आला आहे.
कोल्हापूर : डिझेलच्या किमती झपाट्याने वाढल्याने वाहतूक खर्चातही वाढ होत आहे. त्यामुळे आयात व निर्यात मालवाहतुकीवर ५० टक्के परिणाम झाला आहे. परिणामी डिझेल दरवाढीचा झटका बसल्याने महागाईची शक्यता बाजारपेठेतून व्यक्त होत आहे. त्यातच टोल टॅक्स, वाहन विमा हप्त्यांमध्येही कमालीची वाढ केल्याने ट्रक व्यवसाय मेटाकुटीला आला आहे.
डिझेलच्या किमती प्रतिलिटर ७० रुपयांवर गेल्यामुळे ट्रक व्यवसाय अडचणीत आहे. गेल्या महिन्याभरात डिझेलमध्ये प्रतिलिटर ७ रुपयांनी वाढ झाली. महाराष्ट्र सरकारने पेट्रोल-डिझेलसाठी दुष्काळ निवारणचा अधिभार लावल्याने पेट्रोल-डिझेलच्या किमती इतर राज्यांपेक्षा सर्वांत जास्त महाराष्ट्रात आहेत.
कोल्हापूर जिल्ह्यातून अहमदाबाद (गुजरात), राजस्थान, केरळ, बंगलोर, नागपूर, मुंबई तसेच कर्नाटक, तमिळनाडू, आंध्रप्रदेश येथेही मालवाहतुक ट्रकद्वारे साखर, गूळ, धान्य, कडधान्य, किराणा भुसारी, सिमेंट, बांधकाम व्यवसायातील स्टील आदी साहित्य पाठविले जाते तर विदर्भ-मराठवाडा तून कडधान्य, ज्वारी, तसेच पंजाबमधून गहू, तांदूळ तसेच मोर्वी (राजस्थान) येथून टाईल्स, मार्बल व विविध फरशा आयात होतात.
डिझेलच्या दरवाढीमुळे मालवाहतूक खर्चात किमान २ ते ३ रुपये प्रतिकिमी वाढ अपेक्षित आहे; पण व्यापारी मालवाहतुकीला वाढीव परवडणारे दर द्यायला तयार नाहीत. परिणामी, आयात-निर्यातीच्या वाहतुकीवर मोठा परिणाम होत आहे.
मालट्रक थांबून
व्यापारी मालवाहतुकीला परवडणारे दर द्यायला तयार नसल्याने सध्या वाहतूक परवडत नसल्याने ५० टक्के ट्रक मालवाहतूक आज ठप्प झाली. परिणामी शिरोली जकात नाका, मार्केट यार्ड परिसरात ट्रक थांबून आहेत.
टोल टॅक्स, विमामध्येही वाढ
पेट्रोल-डिझेल दरापाठोपाठ टोल टॅक्समध्येही १ एप्रिलपासून १० टक्के तर वाहनांच्या थर्ड पार्टी विमा रकमेमध्येही ‘आयआरडीए’ने २६ टक्के वाढ केल्याने मालवाहतूकदार अडचणीत आहे.
....तर चक्का जाम..
थर्ड पार्टी विमामधील दरवाढ कमी करावी, या मागणीसाठी आॅल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्यावतीने दिल्लीत २६ आणि २८ एप्रिलला बैठक बोलावली आहे. निर्णय न झाल्यास राज्यभर ‘चक्का जाम’चा इशाराही असोसिएशनने दिला.
बँकांनीही पाठ फिरविली
मालवाहतूक अडचणीत आल्याने ट्रकमालकांना बँकांचे काढलेले कर्ज परतावा करतानाही अवघड बनले. अशा परिस्थितीत नवीन कर्ज देण्यास बँका अथवा फायनान्स कंपन्यांनी पाठ फिरविली.
कोल्हापूर जिल्ह्यातील ट्रक वाहतूक
- ऊस वाहतूक ट्रक : ४५००
- बॉक्साईट वाहतूक : ११ हजार
- लोकल मालवाहतूक : एक हजार ट्रक
- उर्वरित मालवाहतूक : ६ हजार ट्रक
डिझेलच्या वाढत्या दरामुळे ट्रक व्यवसाय अडचणीत आहे. त्यामुळे मालवाहतुकीच्या दरात वाढ करावी लागणार आहे; पण व्यापारी परवडणारे दर देण्यास तयार नसल्याने ट्रक एका जागेवर थांबून आहेत. परिणामी आवक-जावकवर ५० टक्के परिणाम झाला आहे.
- सुभाष जाधव,
अध्यक्ष, कोल्हापूर जिल्हा लॉरी आॅपरेटर्स असोसिएशन