कोल्हापूर : ‘साउंड सिस्टीम’ला बगल दिल्याने ध्वनिप्रदूषणात घट- कोल्हापूर विसर्जन मिरवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2018 01:07 AM2018-09-25T01:07:08+5:302018-09-25T01:08:34+5:30
सार्वजनिक गणेश विसर्जन मिरवणुकीत मोठ्या आवाजाच्या साउंड सिस्टीमला तरुण मंडळांनी यावर्षी बगल दिल्याचा सकारात्मक परिणाम कोल्हापुरात झाला आहे; त्यामुळे मिरवणुकीतील ध्वनिप्रदूषण घटले.
कोल्हापूर : सार्वजनिक गणेश विसर्जन मिरवणुकीत मोठ्या आवाजाच्या साउंड सिस्टीमला तरुण मंडळांनी यावर्षी बगल दिल्याचा सकारात्मक परिणाम कोल्हापुरात झाला आहे; त्यामुळे मिरवणुकीतील ध्वनिप्रदूषण घटले. शिवाजी विद्यापीठाच्या पर्यावरणशास्त्र विभागाच्या पाहणीतून हे स्पष्ट झाले आहे.
पर्यावरणशास्त्र विभागप्रमुख
डॉ. पी. डी. राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक प्राध्यापक डॉ. ए. एस. जाधव, पल्लवी भोसले, विद्यार्थी चेतन भोसले,अर्णव डंबे यांनी ध्वनिपातळी मापनाचे काम केले. त्यांनी ध्वनीपातळीचे शहरात चार विभागांअंतर्गत २२ ठिकाणी मापन केले. ध्वनिमापक उपकरणाद्वारे डेसिबल या एककात त्यांनी मोजमाप केले. यावर्षी औद्योगिक विभाग वगळता शांतता, निवासी, व्यावसायिक विभागातील ध्वनिपातळी ही केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (सीपीसीबी) मानकांपेक्षा वाढलेली आहे; पण अधिकतर ठिकाणी ती कमी असल्याचे या मापनातून दिसून आले.
महाद्वार रोड, गुजरी कॉर्नर, पापाची तिकटी, शिवाजी पेठ, जिल्हाधिकारी कार्यालय, शाहूपुरी, वाय. पी. पोवारनगर परिसरातील ध्वनीप्रदूषणात वाढ झाली. उद्यमनगर, बिंदू चौक, मंगळवार पेठ, ‘सीपीआर’, नागाळा पार्क, ताराबाई पार्क, लक्ष्मीपुरी, राजारामपुरी, गंगावेश परिसरात ध्वनीप्रदूषणात घट झाली आहे.
मिरवणुकीतील या ध्वनिपातळीत लोकांची रहदारी, स्टिरिओ साउंड, ढोल-ताशा, बेंजो, ट्रॅक्टर, जनरेटरच्या आवाजाचा समावेश आहे. मोठ्या आवाजाच्या साउंड सिस्टीमचा वापर झाला नसल्याने शहरातील अधिकतर ठिकाणचे ध्वनिप्रदूषण घटले आहे.
- डॉ. पी. डी. राऊत, विभागप्रमुख, पर्यावरणशास्त्र