कोल्हापूर : रमणमळ्यातील तरुणाची गळफासाने आत्महत्या, पोलीस भरतीचे स्वप्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2018 06:30 PM2018-11-01T18:30:17+5:302018-11-01T18:32:10+5:30
रमणमळा येथील महाविद्यालयीन तरुणाने राहत्या घरी रबरी पाईपने लोखंडी अॅँगलला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी सकाळी घडली. ओंकार कुमार सोनुले (वय २०, रा. न्यू पॅलेस रोड, कोल्हापूर) असे या आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. ओंकारने पोलीस भरतीचे स्वप्न पाहिले होते, असे नातेवाइकांनी ‘सीपीआर’मध्ये सांगितले.
कोल्हापूर : रमणमळा येथील महाविद्यालयीन तरुणाने राहत्या घरी रबरी पाईपने लोखंडी अॅँगलला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी सकाळी घडली. ओंकार कुमार सोनुले (वय २०, रा. न्यू पॅलेस रोड, कोल्हापूर) असे या आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. ओंकारने पोलीस भरतीचे स्वप्न पाहिले होते, असे नातेवाइकांनी ‘सीपीआर’मध्ये सांगितले.
पोलिसांनी सांगितले की, रमणमळ्यात आेंकार सोनुले, त्याची आई व भाऊ असे तिघेजण राहतात. ओंकार लहान असताना त्याच्या वडिलांचे निधन झाले होते. त्यामुळे त्याची आई व भाऊ असे दोघेजण भाजीविक्रीचा व्यवसाय करून चरितार्थ चालवीत असत. गुरुवारी सकाळी भाऊ व आई हे दोघे भाजीविक्रीसाठी बाजारात गेले होते. घरात कोणी नसल्याचे पाहून त्याने रबरी पाईपने लोखंडी अॅँगलला गळफास घेतला.
थोड्या वेळाने त्याची आई घरी परतली असता दरवाजा आतून बंद होता. त्यामुळे तिने शेजाऱ्यांच्या मदतीने दरवाजा उघडला असता ओंकारने गळफास घेतल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर नागरिकांनी ओंकारचा गळफास काढून त्याला रिक्षातून छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात (सीपीआर) आणले; पण उपचारांपूर्वीच तो मृत झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.
त्याचा मृतदेह शवविच्छेदन विभागात नेण्यात आला. दुपारी विच्छेदनानंतर तो नातेवाइकांच्या ताब्यात दिला. ओंकार हा एफ.वाय.बी.ए.मध्ये शिकत होता. तो पोलीस भरतीची तयारी करीत होता. मात्र त्याच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.