गुड न्यूज: देवदेवतांचे फोटो, ई-कचरा गोळा करण्याचे व्रत; ‘कोल्हापूर अर्थ वॉरियर्स’चा उपक्रम
By भीमगोंड देसाई | Updated: January 1, 2025 15:14 IST2025-01-01T15:14:33+5:302025-01-01T15:14:57+5:30
२० कार्यकर्ते राबतात आपल्या शहरासाठी

गुड न्यूज: देवदेवतांचे फोटो, ई-कचरा गोळा करण्याचे व्रत; ‘कोल्हापूर अर्थ वॉरियर्स’चा उपक्रम
भीमगोंडा देसाई
कोल्हापूर : ‘कोल्हापूर अर्थ वॉरियर्स’तर्फे गेल्या तीन वर्षांपासून ई-कचरा संकलन आणि स्वच्छता मोहीम राबवून आदर्श निर्माण केला आहे. सध्या ते दर महिन्याच्या २३ तारखेला शहरातील एका भागात सकाळी एक तास स्वच्छता करतात. रंकाळा टॉवरजवळील महापालिकेच्या दुकान गाळ्यात प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी ९ ते १२ पर्यंत ई-कचरा, टाकाऊ देव, देवतांचे फोटो, पुस्तके प्लास्टिक संकलित केले जाते. संकलित होणारा कचरा पुनर्निर्मितीसाठी सांगली येथील संस्थेकडे पाठवला जातो. संस्थेच्या या उपक्रमामुळे शहराच्या स्वच्छतेला हातभार लागत आहे.
कोल्हापूर अर्थ वॉरियर्सतर्फे पर्यावरण संरक्षण, रक्षणासाठी काम करते. यामध्ये २० कार्यकर्ते सक्रियपणे काम करतात. चार वर्षांपासून पर्यावरणाच्या रक्षणासाठी ही संस्था विविध उपक्रम राबवते. पहिल्या टप्प्यात तीन महिन्यांतून एक दिवस बिंदू चौक, गंगावेस, राजारामपुरी आईचा पुतळा, क्रशर चौक येथे ई-कचरा, खराब झालेले देवदेवतांचे फोटो, मूर्ती, पुस्तकांचे संकलन करण्यात येत होते. यातून सुमारे एक हजार किलो ई-कचरा गोळा होत होता. याला प्रतिसाद मिळत राहिल्याने प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी महापालिकेने दिलेल्या दुकान गाळ्यात कचरा संकलन केले जाते.
एक वर्षापासून हा उपक्रम निरंतरपणे सुरू आहे. याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. एका दिवसात ५०० किलोपर्यंत कचरा एकत्र होतो. यामध्ये प्रामुख्याने खराब झालेले टीव्ही, संगणक, असा ई-कचरा मोठ्या प्रमाणात असतो. हा कचरा उघड्यावर टाकल्यानंतर त्याचे गंभीर परिणाम पर्यावरणावर होतात. म्हणून हा सर्व कचरा वॉरियर्सतर्फे काटेकोरपणे संकलित केला जातो. यांनी सुरू केलेल्या केंद्रामुळे ई-कचरा देऊ इच्छिणाऱ्यांची चांगली सोय झाली आहे. अर्थ वॉरियर्सचे आशिष कोंगळेकर, अभिजित कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली विविध उपक्रम राबवले जात आहेत.
शाळा, महाविद्यालयांत प्रबोधन
पर्यावरणपूरक उपक्रम, उघड्यावर प्लास्टिक, ई-कचरा टाकल्यानंतर पर्यावरणावर, मानवी वस्तीवर कोणते परिणाम होतात, याचे प्रबोधन अर्थ वॉरियर्सतर्फे केले जात आहे. यावेळी शाळा, कॉलेज, महाविद्यालयांनाही प्लास्टिक, ई-कचरा संकलन केंद्र सुरू करावे, असे आवाहनही केले जाते.