कोल्हापूर : मनपा प्रभाग समिती सभापतींच्या निवडी शुक्रवारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2018 03:48 PM2018-04-30T15:48:43+5:302018-04-30T15:48:43+5:30
कोल्हापूर महानगरपालिकेतील चार प्रभाग समिती सभापतींची निवडणुक शुक्रवारी होत असून त्याकरीता इच्छुकांनी बुधवारी दुपारी तीन ते सायंकाळी पाच यावेळेत नामनिर्देशनपत्रे भरायची आहेत.
कोल्हापूर : महानगरपालिकेतील चार प्रभाग समिती सभापतींची निवडणुक शुक्रवारी होत असून त्याकरीता इच्छुकांनी बुधवारी दुपारी तीन ते सायंकाळी पाच यावेळेत नामनिर्देशनपत्रे भरायची आहेत.
विभागीय कार्यालय क्रमांक १ ते ३ अंतर्गत असलेल्या प्रभाग समितींवर कॉँग्रेस व राष्ट्रवादी आघाडीचे निर्विवाद बहुमत असल्याने तेथे या आघाडीचे उमेदवार सभापती होतील मात्र विभागीय कार्यालय क्रमांक ४ अंतर्गत प्रभाग समितीवर कॉँग्रेस -राष्ट्रवादीचे १० व भाजप - ताराराणी आघाडीचे १० असे समान बलाबल असल्याने चिठ्ठी टाकून निर्णय होणार आहे.
प्रभाग समिती सभापती म्हणून ज्यांना संधी दिली जाते, त्यांना अन्य पदे देताना बाजूला ठेवले जाते असा समज असल्याने सहसा प्रभाग समिती सभापतीपदासाठी चढाओढ होत नाही. यावेळी देखील अशीच परिस्थिती आहे. सभापती निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असला तरी दोन्ही आघाडीच्या पातळीवर शांतता आहे.
सध्या गांधी मैदान प्रभाग समितीवर प्रतिक्षा पाटील, राजारामपुरी विभागीय कार्यालय समितीवर छाया पोवार तर ताराराणी मार्केट विभागीय कार्यालय अंतर्गत प्रभाग समितीवर सुरेखा शहा सभापती असून तिघेही कॉँग्रेसचे आहेत.
शिवाजी मार्केट विभागीय कार्यालय अंतर्गत प्रभाग समितीवर राष्ट्रवादीचे अफजल पिरजादे सभापती आहेत. त्यापैकी पाटील, पोवार व पिरजादे हे गेल्या दोन वर्षापासून सभापतीपदावर कायम आहेत.
यावेळी राष्ट्रवादीकडून अजझल पिरजादे यांना डच्चू दिला जाण्याची शक्यता आहे. त्यांनी स्थायी सभापती निवडणुकीत पक्ष विरोधी मतदान केले असल्याने त्यांना पुन्हा संधी दिली जाणार नाही हे स्पष्ट आहे.
कॉँग्रेसकडून सुरेखा शहा यांना महिला व बाल कल्याण समितीचे सभापतीपद दिल्यामुळे त्यांनाही पुन्हा संधी मिळणार नाही. प्रतिक्षा पाटील व छाया पोवार यांना सलग तिसऱ्यांदा संधी मिळणार का हा उत्सुकतेचा विषय आहे.
गतवर्षी निलेश देसाई यांचे नगरसेवक पद रद्द झाल्यामुळे ताराराणी कार्यालयांतर्गत प्रभाग समिती कॉँग्रेसच्या ताब्यात आली होती. परंतु देसाई यांच्या जागी रत्नेश शिरोळकर निवडून आल्याने तेथे १० - १० असे समान बलाबल असल्याने चिठ्ठी टाकून निर्णय होणार आहे. यापूर्वी या समितीवर राजसिंह शेळके (ताराराणी) यांची चिठ्ठीद्वारे निवड झाली होती. बुधवारी सकाळी सभापती पदाचे उमेदार निश्चित केले जाणार आहेत.