कोल्हापूर : सोवळं न नेसल्यानं भारत पाटणकर आणि सहकाऱ्यांना अंबाबाई मंदिराच्या गाभाऱ्यात नाकारला प्रवेश
By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2017 01:06 PM2017-12-15T13:06:05+5:302017-12-15T14:55:25+5:30
सोवळं न नेसल्याने सामाजिक कार्यकर्ते भारत पाटणकर व त्यांच्या सहकाऱ्यांना अंबाबाई मंदिरातील गाभाऱ्यातील प्रवेश नाकारण्यात आला आहे.
कोल्हापूर- सोवळे नेसण्यास नकार दिल्याने शुक्रवारी कोल्हापुरातील अंबाबाई मंदिरातील पूजाऱ्यांनी श्रमिक मुक्ती दलाचे नेते भारत पाटणकर, त्यांच्या पत्नी गेल आॅम्वेट यांच्यासह कार्यकर्त्यांना गाभाऱ्यात जाण्यापासून रोखल. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत पाटणकर यांनी देवीच्या पाया पडण्यासाठी आम्हाला रोखणाऱ्या धर्ममार्तंड दलालांना शासनाने हिवाळी अधिवेशनातच पूजारी हटाओचा कायदा करावा अन्यथा आम्ही जानेवारी महिन्यात तीव्र आंदोलन करू असा इशारा दिला.
शुक्रवारी सकाळी साडे अकरा वाजता भारत पाटणकर त्यांच्या पत्नी गेल आॅम्वेट यांच्यासह पन्नास कार्यकर्ते अंबाबाईच्या दर्शनासाठी मंदिरात गेले. देवीच्या पाया पडण्यासाठी गाभाऱ्यात जाताना त्यांना श्रीपूजकांनी सोवळे नेसल्याशिवाय गाभाऱ्यात जाता येणार नाही असे सांगितले. त्यावर पाटणकर यांनी सोवळ्याचा नियम कोणी घातला, आम्ही तो मानत नाही असे म्हणताच पूजाऱ्यांनी हे नियम आम्ही नव्हे तर धर्माने घालून दिले आहेत. तुम्ही सोवळे नेसूनच आत या असे सांगितले. मात्र पाटणकरांनी त्यास नकार दिला.
दरम्यान कार्यकर्ते व पूजाऱ्यांमध्ये काही काळ बाचाबाची झाली. अखेर पाटणकरांनी आई आम्ही तुझ्या दर्शनासाठी आलो आहोत. मात्र हे धर्ममार्तंड लोक आम्हाला तुझ्या पायाजवळ येण्यापासून रोखले आहे. त्यामुळे इथूनच मी तुला नमस्कार करतो असे म्हणत देवीला नमस्कार केला. एक प्रदक्षिणा मारली व मंदिरातून बाहेर आले.
पाटणकर यांनी त्यानंतर लगेचच पत्रकार परिषद घेवून या विषयावर आपली भूमिका मांडली. ते म्हणाले, ही देवी आमची आद्य माता, कुलस्वामिनी आहे. वाडवडिलांपासून आम्ही तिचे दर्शन घेत आलो आहे. शिर्डी, पंढरपूर येथे दर्शन घेण्यापासून कोणी रोखलेले नव्हते, पण कोल्हापूरच्या अंबामातेजवळ जाण्यापासून आम्हाला रोखणारे हे कोण, सोवळ्याचा नियम कोणी सांगितला, धर्म लिहणारी माणसे कोण होती, सोवळे नेसले की माणूस शुद्ध होता अन्यथा तो अशुद्ध ही व्याख्या कोणी ठरवली. महाराष्ट्रातील अन्य कोणत्याही मंदिरात सोवळ्याचा नियम नाही. अंबाबाई ही बहुजनांची माता आहे, तिला सोवळ्याने दर्शन घ्यायचे की नाही, हे बहुजन ठरवतील. आम्हाला देवीजवळ जाण्यासाठी कोणतेही दलाल नकोत, त्यामुळे पंढरपूरातील बडवे हटवले त्याप्रमाणे शासनाने सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनातच पूजारी हटाओचा कायदा करावा अशी आमची मागणी आहे. तसे न झाल्यास आम्ही जानेवारी महिन्यात मोठ्या जनसमुदायासह तीव्र आंदोलन करू. यावेळी अनिल म्हमाणे, मनिष देसाई, संपत देसाई, मारुती पाटील, टी.एल. पाटील, पांडूरंग पोवार यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.