कोल्हापूर : महापालिका रुग्णालये सुसज्ज करा, डेंग्यू, स्वाईन फ्लूच्या पार्श्वभूमीवर आवाहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2018 06:55 PM2018-10-30T18:55:17+5:302018-10-30T18:57:23+5:30
कोल्हापूर शहरात डेंग्यू आणि स्वाईन फ्लू या साथींच्या रोगात नागरिकांचे जीव जात असून, महापालिका प्रशासन गप्प आहे, अशा रोगांसाठी ‘सीपीआर’ हा एकमेव दवाखाना असल्याने शहर व जिल्ह्यासह आसपासच्या परिसरातील रुग्णांचा भार ‘सीपीआर’ रुग्णालयावर पडत आहे; त्यामुळे शहरातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी महानगरपालिकेने घ्यावी. याकरिता महापालिकेचे दवाखाने व वॉर्ड दवाखाने यंत्रसामुग्री, कर्मचारी व औषधांनी सुसज्ज करावेत, अशी सूचना आमदार राजेश क्षीरसागर यांनी महापालिका प्रशासनास केली.
कोल्हापूर : शहरात डेंग्यू आणि स्वाईन फ्लू या साथींच्या रोगात नागरिकांचे जीव जात असून, महापालिका प्रशासन गप्प आहे, अशा रोगांसाठी ‘सीपीआर’ हा एकमेव दवाखाना असल्याने शहर व जिल्ह्यासह आसपासच्या परिसरातील रुग्णांचा भार ‘सीपीआर’ रुग्णालयावर पडत आहे; त्यामुळे शहरातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी महानगरपालिकेने घ्यावी. याकरिता महापालिकेचे दवाखाने व वॉर्ड दवाखाने यंत्रसामुग्री, कर्मचारी व औषधांनी सुसज्ज करावेत, अशी सूचना आमदार राजेश क्षीरसागर यांनी महापालिका प्रशासनास केली.
शहरातील डेंग्यू आणि स्वाईन फ्लू रोगाची साथ आटोक्यात आणण्यासाठी आमदार क्षीरसागर यांनी मंगळवारी महापालिकेत आयुक्त डॉ. अभिजित चौधरी, उपायुक्त मंगेश शिंदे, आरोग्याधिकारी डॉ. दिलीप पाटील, मुख्य आरोग्य निरीक्षक डॉ. विजय पाटील यांच्यासह आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यावेळी या सूचना दिल्या.
बारा दिवसांपूर्वी डेंग्यूने उदयोन्मुख युवा फुटबॉल खेळाडूचा, तर स्वाईन फ्लूने वृद्ध डॉक्टरांचा बळी घेतला. एकीकडे साथीच्या रोगांनी शहरात थैमान घातले असताना प्रशासन आपली जबाबदारी झटकून त्याकडे दुर्लक्ष करीत आहे. मुंबई, पुणे शहरात तेथील महापालिका प्रशासनाने स्थानिक दवाखाने सुसज्ज ठेवले आहेत. त्याच पद्धतीने महानगरपालिकेचे पंचगंगा, सावित्रीबाई फुले, आयसोलेशन दवाखाने सुसज्ज ठेवावेत, असे आमदार क्षीरसागर यांनी सांगितले.
दवाखान्यामध्ये कायमस्वरूपी डॉक्टर उपलब्ध ठेवण्याच्या दृष्टीने शासनाकडे पदे भरतीची मागणी करावी, त्याचा पाठपुरावा स्वत: मी मंत्रालय स्तरावर करेन. त्याचबरोबर शहरातील सेवाभावी डॉक्टरांना या रुग्णालयात सेवा देण्याबाबत महापालिकेने आवाहन करावे, अशा सूचनाही त्यांनी मांडल्या. आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी आलेल्या सूचनांचा आढावा घेऊन लवकरात लवकर त्यावर उपाययोजना करण्याच्या सूचना संबंधित अधिकाºयांना दिल्या.
बैठकीस परिवहन सभापती राहुल चव्हाण, माजी उपमहापौर रविकिरण इंगवले, पद्माकर कापसे, उदय पोवार, दीपक गौड, जयवंत हारुगले, रमेश खाडे, धनाजी दळवी, तुकाराम साळोखे, अजित गायकवाड, अनिल पाटील, रघुनाथ टिपुगडे, राजू पाटील, राहुल चव्हाण, विशाल देवकुळे, अश्विन शेळके, निलेश हंकारे, मंदार तपकिरे, गजानन भुर्के, राजू काझी, पियुष चव्हाण, अविनाश कामते, ओंकार परमणे, कपील सरनाईक, आदी पदाधिकारी उपस्थित होते.