कोल्हापूर : शाहूवाडी पोलिस ठाण्याच्या कोठडीतून चार आरोपींचे पलायन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2018 11:37 AM2018-05-18T11:37:48+5:302018-05-18T11:37:48+5:30
शाहूवाडी पोलिस ठाण्यातून चार अट्टल आरोपी शुक्रवारी पहाटे कोठडीचे लॉकअप तोडून पळून गेले. या आरोपींवर दरोडा, घरफोडीचे गुन्हे यापूर्वी दाखल आहेत. पोलिसांनी तत्काळ नाकेबंदी केली असून पळून गेलेल्या आरोपींच्या शोधासाठी शोधपथके रवाना केली आहेत.
कोल्हापूर : शाहूवाडी पोलिस ठाण्यातून चार अट्टल आरोपी शुक्रवारी पहाटे कोठडीचे लॉकअप तोडून पळून गेले. या आरोपींवर दरोडा, घरफोडीचे गुन्हे यापूर्वी दाखल आहेत. पोलिसांनी तत्काळ नाकेबंदी केली असून पळून गेलेल्या आरोपींच्या शोधासाठी पथके रवाना केली आहेत.
दरोडा आणि घरफोडीचे गुन्हे दाखल असलेले सूरज सर्जेराव डबडे (वय २२, रा. वाठार पैकी कासारवाडी, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर), ओंकार महेश सूर्यवंशी (वय १९, रा. बँक आॅफ इंडियासमोर, कासेगाव, ता. वाळवा, जि. सांगली), गोविंद वसंत माळी (वय १९, रा. यशवंततनगर कॉलनी, कासेगाव, जि. सांगली) आणि विराज गणेश कारंडे (वय १९, रा. पाडळी दरवेज, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर) हे चार आरोपी शाहूवाडी पोलिस ठाण्यात २0 मे पर्यंत रिमांडवर पोलिस कोठडीत होते.
या आरोपींवर शाहूवाडी पोलिस ठाण्यात ३/२0१८ कलम ४५४, ४५७ आणि ३८0 नुसार गुन्हा दाखल असून त्यांना या पोलिस ठाण्यात रिमांडवर पोलिस कोठडीत ठेवण्यात आले होते. शुक्रवारी पहाटे ४ ते ५ या वेळेत या चारही आरोपींनी शाहूवाडी पोलिस ठाण्याच्या कोठडीच्या लॉकअपच्या दरवाजाचे ग्रील वाकवून पळून गेले.
हे आरोपी कोल्हापूरच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने पकडले होते. शाहूवाडी तालुक्यातील घरफोडीच्या तपासासाठी कोल्हापूर पोलिसांच्या ताब्यातून चार दिवसा पूर्वी म्हणजे दि. १६ मे रोजी या आरोपींचा ताबा शाहूवाडी पोलिसांनी ताबा घेतला होता. शाहूवाडी न्यायालयाने या आरोपींना पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला होता. त्यांची कोठडीची मुदत २0 मे रोजी संपणार होती.
पोलिस कोठडीतून चार आरोपी पळून गेल्याचे समजताच शाहूवाडी पोलिसांनी परिसराची नाकाबंदी केली असून त्यांच्या शोधासाठी ठिकठिकाणी पथके रवाना केली आहेत. पोलिस निरिक्षक अनिल गाडे, पोलिस नाईक सराटे, पोलिस शिपाई मोळके, तसेच कोल्हापूर नियंत्रण कक्षातून अधिक तपास सुरु आहे.