कोल्हापूर : प्रत्येक विभागात कारागीर विद्यापीठ स्थापन करणार : संभाजीराव पाटील निलंगेकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2018 05:26 PM2018-02-12T17:26:23+5:302018-02-12T18:38:36+5:30
कारागीर हे देशाची संपत्ती असून ती जपणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने महाराष्ट्रातील प्रत्येक विभागात कारागीर कुशल विद्यापीठाची स्थापना केली जाईल. सिद्धगिरी मठावरील कारागीर ज्ञानपीठाला आवश्यक त्या परवानगी, मान्यता देण्यासाठी प्रयत्नशील आहे, असे प्रतिपादन कामगार व कौशल्य विकास मंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी सोमवारी येथे केले.
कोल्हापूर : कारागीर हे देशाची संपत्ती असून ती जपणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने महाराष्ट्रातील प्रत्येक विभागात कारागीर कुशल विद्यापीठाची स्थापना केली जाईल. सिद्धगिरी मठावरील कारागीर ज्ञानपीठाला आवश्यक त्या परवानगी, मान्यता देण्यासाठी प्रयत्नशील आहे, असे प्रतिपादन कामगार व कौशल्य विकास मंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी सोमवारी येथे केले.
आज कानेरी मठ, कोल्हापूर येथे सिद्धगिरी कारागीर महाकुंभ २०१८ चे उद्घाटन केले. ग्रामीण भागातील कारागिरांचे विविध कौशल्य दर्शविणारे ८० हून अधिक स्टॉल्स येथे उभारण्यात आले आहेत. मी देखील या कारागिरांचे कौशल्य शिकण्याचा एक छोटासा प्रयत्न केला. pic.twitter.com/VB8DU2AHDT
— Sambhaji Patil N (@sambhajipatil77) February 12, 2018
कणेरी (ता. करवीर) येथील श्री क्षेत्र सिद्धगिरी महासंस्थानतर्फे आयोजित सिद्धगिरी कारागीर महाकुंभातील ‘कारागीर उत्सव’या परिसंवादाच्या उदघाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी गो संवर्धन, कृषी व ग्रामविकास मार्गदर्शक हृदयनाथसिंह, तर राष्ट्रीय कारागीर पंचायतीचे माजी अध्यक्ष नरेंद्रनाथ मेहरोत्रा, महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय विश्वविद्यालयाचे डॉ. मनोजकुमार प्रमुख उपस्थित होते.
कामगार व कौशल्य विकास मंत्री पाटील निलंगेकर म्हणाले, केंद्र सरकारने महाराष्ट्रामध्ये सहा कौशल्य विद्यापीठ निर्माण करण्याचा निर्णय घेतला आहे. यातील पहिले विद्यापीठ चंद्रपूरमध्ये उभारणार आहे. यामध्ये जंगल परिसरातील उत्पादन, कौशल्याला बळ दिले जाणार आहे. राष्ट्रीय कारागीर पंचायतीचे माजी अध्यक्ष मेहरोत्रा म्हणाले, स्मार्ट व्हिलेज नको समृद्ध ग्राम बनणे आवश्यक आहे.
कारागीरांचे विश्वविद्यालय उभे रहावे. डॉ. मनोजकुमार म्हणाले, विकासाच्या नावाखाली कारागिरी मारली गेली आहे. गावांना पुनर्रजीवन देणे गरजेचे आहे. या कार्यक्रमात कौशल्य विकास विभागाअंतर्गत असणाऱ्या प्रशिक्षण संस्थांच्यावतीने ७५ हजार रुपयांच्या मदतीचा धनादेश मंत्री पाटील निलंगेकर यांच्या हस्ते सिद्धगिरी महासंस्थानला सुर्पूद करण्यात आला.
यावेळी माजी मंत्री अण्णासाहेब डांगे, श्यामबिहारी गुप्ता, गोपाल उपाध्याय, कानसिंग निर्माण, विवेक चतुर्वेदी, वर्धा येथील मगन संग्रहालयच्या अध्यक्ष विभा गुप्ता, कौशल्य विकास विभागाचे सहायक संचालक करीम, सिद्धगिरी मठाचे कार्यकारी संचालक आर. डी. शिंदे, पी. डी. कांबळे, बी. जी. मांगले, आदी उपस्थित होते.
मंत्री पाटील निलंगेकर म्हणाले
- *कौशल्य विकासासह शेतकरी, कारागिरांच्या उत्पादनाला बाजारपेठ उपलब्ध करुन देण्यास शासनाचे प्राधान्य
- *सिद्धगिरी मठाने पुढाकार घेवून गुरुकुल शिक्षण पद्धती विकसित करावी.
- * स्वयंपूर्ण गावांच्या निर्मितीसाठी कारागिरांच्या कलेला अधिक प्रोत्साहन देणे गरजेचे.