कोल्हापूर : काजू फळपीक विकास समितीची स्थापना, ३२ सदस्यांमध्ये जिल्ह्यातील तिघांचा समावेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2018 05:51 PM2018-07-20T17:51:52+5:302018-07-20T17:55:56+5:30
काजू पिकाच्या सर्वंकष विकासाचे धोरण निश्चित करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाने ‘काजू फळपीक विकास समिती’ची स्थापना केली आहे.
कोल्हापूर : काजू पिकाच्या सर्वंकष विकासाचे धोरण निश्चित करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाने ‘काजू फळपीक विकास समिती’ची स्थापना केली आहे.
कोकण विभागातील सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये काजूबियांचे मोठे उत्पादन होते. अनेक शेतकऱ्यांचे हे उदरनिवार्हाचे साधन असून, या दोन्ही जिल्ह्यांसह कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा, चंदगड तालुक्यांतही काजूचे मोठे पीक येते. या पिकाच्या लागवडीपासून ते उत्पादनापर्यंत कीड, रोग यांचा मोठा परिणाम होतो. शेतकऱ्यांना येणाऱ्या या अडचणींचा विचार करून या पिकाच्या सर्वंकष विकासासाठी ही समिती नेमण्यात आली आहे.
गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती नेमण्यात आली आहे. यामध्ये आजऱ्यातील भाजपचे कार्यकर्ते दयानंद भुसारी यांचा समावेश करण्यात आला आहे. तसेच चंदगड येथील दयानंद काणेकर आणि रमेश अनंत मुळीक यांचाही या समितीमध्ये समावेश करण्यात आला आहे.
कोकण विभाग हे या समितीचे कार्यक्षेत्र असून, दोन महिन्यांच्या कालावधीत या समितीने आपला अहवाल द्यावयाचा आहे. उत्पादक शेतकरी, उद्योजक यांच्याशी चर्चा करून या व्यवसायाबाबतच्या अडचणी समजून घ्यावयाच्या असून, त्यानंतर अभिप्रायासह अहवाल शासनाला सादर करावयाचा आहे.