कोल्हापूर : क्षयरोग निर्मूलनासाठी ‘टीबी कॉल सेंटर’ची स्थापना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2018 12:54 PM2018-07-02T12:54:07+5:302018-07-02T12:55:50+5:30
जागतिक आरोग्य संघटनेने २०३० पर्यंत क्षयरोग निर्मूलनाचे ध्येय निश्चित केले असून, सरकारने २०२५ हे साल क्षयरोग निर्मूलनासाठी निश्चित केले आहे. त्याअनुषंगाने सुधारित राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमामध्ये विविध नवीन योजनांचा अंतर्भाव करण्यात आला असल्याची माहिती जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. यू. जी. कुंभार यांनी दिली.
कोल्हापूर : जागतिक आरोग्य संघटनेने २०३० पर्यंत क्षयरोग निर्मूलनाचे ध्येय निश्चित केले असून, सरकारने २०२५ हे साल क्षयरोग निर्मूलनासाठी निश्चित केले आहे. त्याअनुषंगाने सुधारित राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमामध्ये विविध नवीन योजनांचा अंतर्भाव करण्यात आला असल्याची माहिती जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. यू. जी. कुंभार यांनी दिली.
यातीलच एक भाग म्हणून भारत सरकारने टीबी कॉल सेंटर सुरू केले आहे. ही टीबी हेल्पलाईन टोल फ्री असून यामध्ये अर्धवट उपचार घेतलेल्या रुग्णांना पुन्हा उपचार सुरू करण्याकरिता समुपदेशन करण्यात येणार आहे. तसेच या कॉल सेंटरमार्फत सार्वजनिक व खासगी क्षेत्रातील क्षयरुग्णांची नोंदणी करण्यात येणार आहे.
सार्वजनिक व खासगी क्षेत्रांतील क्षयरुग्णांकडून येणाऱ्या कॉलला मार्गदर्शन केले जात असून, क्षयरोगाविषयी जास्तीत जास्त जाणून घेण्याकरिता सर्व जनतेने याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा क्षयरोग अधिकारी कुंभार यांनी केले आहे.