कोल्हापूर : ‘ईव्हीएम - व्हीव्हीपॅट’ जनजागृती मोहिमेत मतदारांनी सहभागी व्हावे : सुभेदार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2018 06:33 PM2018-12-20T18:33:17+5:302018-12-20T18:33:56+5:30
कोल्हापूर : आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीमध्ये ‘ईव्हीएम’बरोबरच ‘व्हीव्हीपॅट’चा वापर होणार आहे. यासाठी जिल्हा निवडणूक विभागाने जनजागृती मोहीम ...
कोल्हापूर : आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीमध्ये ‘ईव्हीएम’बरोबरच ‘व्हीव्हीपॅट’चा वापर होणार आहे. यासाठी जिल्हा निवडणूक विभागाने जनजागृती मोहीम हाती घेतली असून, त्याची गुरुवारी सुरुवात झाली आहे. यामध्ये जिल्ह्यातील मतदारांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात ‘ईव्हीएम - व्हीव्हीपॅट’ जनजागृती जिल्हास्तरीय मोहिमेच्या प्रारंभप्रसंगी ते बोलत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी स्नेहल भोसले, जिल्हा पुरवठा अधिकारी अमित माळी, करवीर प्रांताधिकारी सचिन इथापे, महापालिका अतिरिक्त आयुक्त श्रीधर पाटणकर, निवडणूक तहसीलदार शैलजा पाटील, तहसीलदार सचिन गिरी, सविता लष्करे, साहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी अपर्णा मोरे, आदी प्रमुख उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते व मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत मोहिमेचे उद्घाटन झाले. कोल्हापूर दक्षिण, करवीर आणि कोल्हापूर उत्तर या विधानसभा मतदारसंघासाठी नियुक्त केलेल्या ‘ईव्हीएम’ व ‘व्हीव्हीपॅट’ जनजागृती करणाºया टिम रवाना करण्यात आल्या.
जिल्हाधिकारी सुभेदार म्हणाले, ‘ईव्हीएम’बरोबर ‘व्हीव्हीपॅट’ म्हणजे खात्री बरोबर विश्वास हे सूत्र आहे. या नव्या मतदान प्रक्रियेमुळे मतदारांना आपले मत ज्यांना केले आहे, त्याची खात्री करता येणार आहे. बॅलेट युनिटचे बटन दाबल्यानंतर केवळ ७ सेकंदात त्यांनी कोणाला मतदान केले, हे ‘व्हीव्हीपॅट’ मशीनवर स्लिपद्वारे दिसणार आहे. जिल्ह्यातील प्रत्येक गावात ही मोहीम होणार असून, महिनाभर हे काम सुरू राहणार आहे; त्यामुळे मतदारांनी या जनजागृती मोहिमेची माहिती करून घ्यावी, तसेच या मतदान पद्धतीबाबत काही शंका असल्यास त्याचे निरसन करून घ्यावे.
स्नेहल भोसले यांनी स्वागत केले. शैलजा पाटील यांनी आभार मानले.
-----------------------------------------------------------------------------------------------
प्रत्येक विधानसभा मतदारसंघासाठी दोन टीम
जिल्ह्यातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघासाठी दोन टीम रवाना झाल्या असून, प्रत्येक टिममध्ये पाच अधिकारी, कर्मचारी नियुक्त केले आहेत. या टिम मधील अधिकारी-कर्मचाºयांनी जनतेच्या शंकांचे निरसन करून, मतदान प्रक्रियेबाबत सकारात्मक वातावरण निर्माण करावे, असे निर्देश जिल्हाधिकाºयांनी दिले.
-------------------------------------------------------------------------------------------------------
फोटो : २०१२२०१८ - कोल - ‘व्हीव्हीपॅट’ मोहीम ०१
फोटोओळी : कोल्हापुरातील जिल्हाधिकारी कार्यालयात गुरुवारी ‘ईव्हीएम-व्हीव्हीपॅट’ जनजागृती मोहिमेची सुरुवात जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांच्या हस्ते झाली. यावेळी सचिन इथापे, संजय शिंदे, स्नेहल भोसले, आदी उपस्थित होते.
--------------------------------------------
(प्रवीण देसाई)