कोल्हापूर : प्रदर्शनातून पर्यटन विकासाला चालना : चंद्रकांतदादा पाटील, चला पर्यटनाला प्रदर्शनास प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2018 06:48 PM2018-02-23T18:48:35+5:302018-02-23T18:48:35+5:30
चला पर्यटनाला हे प्रदर्शन अतिशय दिशादर्शक, अप्रतिम असून पर्यटकांना आकर्षित करण्यास सहाय्यभूत ठरेल, असा विश्वास महसूलमंत्री आणि कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी व्यक्त केला.
कोल्हापूर : चला पर्यटनाला हे प्रदर्शन अतिशय दिशादर्शक, अप्रतिम असून पर्यटकांना आकर्षित करण्यास सहाय्यभूत ठरेल, असा विश्वास महसूलमंत्री आणि कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी व्यक्त केला.
विभागीय माहिती कार्यालयातर्फे शाहु स्मारक भवनात आयोजित कोल्हापूर, सांगली आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रत्येकी पंन्नास पर्यटनस्थळांच्या अशा १५० छायाचित्रांच्या चला पर्यटनाला या प्रदर्शनास पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी ते बोलत होते.
माहिती उपसंचालक सतीश लळीत, पणनचे विशेष लेखा परीक्षक बाळासाहेब यादव, विद्या प्रबोधनीचे अध्यक्ष राहुल चिक्कोडे, कोल्हापूर हॉटेल मालक संघाचे अध्यक्ष उज्वल नागेशकर, सचिव सिध्दार्थ लाटकर, सचिन शानबाग,
जिल्हा माहिती अधिकारी वर्षा पाटोळे, सहायक संचालक एस.आर.माने, वास्तूशास्त्रज्ञ अमरजा निंबाळकर आदि उपस्थित होते.
देशात पर्यटन क्षेत्र वाढत असून त्यांना योग्य ठिकाणांची दिशादर्शक माहिती होणे गरजेचे आहे. कोल्हापूर जिल्ह्यातही आज पर्यटकांचा ओढा वाढला असून या पर्यटकांना जिल्ह्यातील विविध ऐेतिहासिक, धार्मिक, निसर्ग पर्यटनाच्या ठिकाणांची माहिती होणे गरजेचे असून माहिती व जनसंपर्क विभागाने आयोजित केलेल्या या प्रदर्शनामुळे बाहेरुन येणा?्या पर्यटकांना कोल्हापुरातील पर्यटनाच्या ठिकाणांची माहिती मिळणे सोयीचे होईल.
माहिती विभागाचे हे छायाचित्र प्रदर्शन हे अप्रतिम संकलन असल्याचा उल्लेख करुन पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, जिल्ह्यातील पर्यटन विकासाला शासनाने सर्वोच्च प्रधान्य दिले असून अधिकाधिक पर्यटनस्थळे विकसित करुन पर्यटकांची सोय करण्यावर भर दिला आहे. येत्या एप्रिल-मे मध्ये जिल्ह्यातील नव नव्या पर्यटन ठिकाणांची पाहणी करण्यासाठी दोन दोन दिवसाच्या पर्यटन सहलींचे आयोजन करण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी जाहीर केले.
पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी माहिती कार्यालयाने आयोजित केलेल्या या प्रदर्शनातील कोल्हापूर, सांगली व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन स्थळांच्या छायाचित्रांची पाहणी करुन प्रदर्शनाच्या आयोजनाबद्दल समाधान व्यक्त केले. तिन्ही जिल्ह्यातील बहुतांशी पर्यटन ठिकाणांचा यात समावेश केल्याबद्दल तसेच हे प्रदर्शन देखणे, सुटसुटीत आणि आकर्षक केल्याबद्दल कौतुक केले.
यावेळी प्रसिध्द हॉटेल मालक संघाचे शंकरराव यमगेकर, मॅक्स डिजिटलचे प्रमुख प्रशांत कुलकर्णी, अरुण चोपदार, उमेश राऊत, शाहू स्मारक भवनचे व्यवस्थापक कृष्णाजी हारुगडे उपस्थित होते.