कोल्हापूर : खर्च कमी, वाढत्या संधीमुळे वाणिज्य शाखेकडे कल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2018 10:55 AM2018-05-15T10:55:02+5:302018-05-15T10:55:02+5:30
अभियांत्रिकी, वैद्यकीय विद्याशाखांपेक्षा शिक्षणाचा कमी असलेला खर्च, रोजगारक्षम होण्यासाठी लागणारा कमी वेळ आणि वाढत्या संधी यांमुळे वाणिज्य शाखेकडे विद्यार्थ्यांचा कल वाढत आहे. समाजाच्या गरजेप्रमाणे हा बदल होत असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले.
संतोष मिठारी
कोल्हापूर : अभियांत्रिकी, वैद्यकीय विद्याशाखांपेक्षा शिक्षणाचा कमी असलेला खर्च, रोजगारक्षम होण्यासाठी लागणारा कमी वेळ आणि वाढत्या संधी यांमुळे वाणिज्य शाखेकडे विद्यार्थ्यांचा कल वाढत आहे. समाजाच्या गरजेप्रमाणे हा बदल होत असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले.
शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने दहावीच्या विद्यार्थ्यांच्या घेतलेल्या कलचाचणीचा निष्कर्ष शनिवारी (दि. १२) जाहीर झाला. त्यात २१ टक्के विद्यार्थ्यांनी वाणिज्य शाखेमध्ये प्रवेशित होण्याबाबतचा कल दर्शविला आहे.
‘वाणिज्य’कडील विद्यार्थ्यांचा वाढता कल का आहे, याची कारणे तज्ज्ञांकडून ‘लोकमत’ने जाणून घेतली. याबाबत ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. जे. एफ. पाटील म्हणाले, वैद्यकीय आणि अभियांत्रिकी विद्याशाखांमधील शिक्षणाचा खर्च अधिक असतो. या अभ्यासक्रमाच्या पूर्ततेसाठी जास्त कालावधी लागतो.
या तुलनेत वाणिज्य शाखेचा पदवी, पदव्युत्तर शिक्षणाचा खर्च कमी येतो. रोजगारक्षम होण्याचा कालावधी कमी आहे. त्यासह विमा, बॅँकिंग, आदी क्षेत्रांत रोजगाराच्या संधी वाढत असल्याने वाणिज्य शाखेकडे विद्यार्थ्यांचा कल वाढल्याचे दिसते.
शिवाजी विद्यापीठाचे वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे अधिष्ठाता प्रा. डॉ. ए. एम. गुरव म्हणाले, वाणिज्य आणि व्यवस्थापन हे सर्व क्षेत्रांना आवश्यक आहे. इमारत बांधण्यासाठी कॉस्टिंग करावे लागते. मशिनरी तयार करताना किंमत ठरविणे, उत्पादन निर्मितीनंतर तिचे विपणन करणे अशा प्रत्येक ठिकाणी वाणिज्य व्यवस्थापन लागते. ‘जीएसटी’मुळे कर नियोजन, हिशेब ठेवण्यासाठी सल्लागारांची मागणी वाढत आहे. व्यावसायिकपणे करिअर करता येत असल्याने वाणिज्य शाखेकडे विद्यार्थ्यांचा कल वाढत आहे. गेल्या चार वर्षांत वाणिज्य, व्यवस्थापन शाखेमध्ये प्रवेशित होणाऱ्या विद्यापीठ पातळीवरील विद्यार्थ्यांची संख्या वाढली आहे.
‘वाणिज्य’कडील कलाची कारणे
- * पदविका, पदवी, पदव्युत्तर शिक्षणासाठी विविध अभ्यासक्रम.
- * जगभरात विमा, बँकिंग, नॉन-बँकिंग फायन्सस, ई-ट्रेडमध्ये होणारी वाढ
- * अन्य विद्याशाखांच्या तुलनेत रोजगारक्षम होण्यासाठी लागणारा कमी कालावधी.
शिवाजी विद्यापीठातील गेल्या चार वर्षांतील विद्यार्थिसंख्या
वर्ष वाणिज्य शाखा व्यवस्थापन शाखा
२०१३-१४ ४०६०४ ४५८४
२०१४-१५ ३८२३३ ४६६५
२०१५-१६ ४५७६२ ४९२३
२०१६-१७ ४७३८३ ५२५२
तुकड्या वाढविल्या
कोल्हापूर शहरामधील महाविद्यालयांतील वाणिज्य इंग्रजी माध्यमाची एकूण प्रवेश क्षमता ८८० आहे. त्यासाठी गेल्या वर्षी १४२९ अर्ज दाखल झाले. जादा ५४९ जागांवरील प्रवेशासाठी डी. डी. शिंदे सरकार कॉलेज, विवेकानंद महाविद्यालयाला स्वयंअर्थसाहाय्यित तुकडी देण्यात आली.
वाणिज्य शाखेत प्रवेशित झालेले शहरातील विद्यार्थी
वर्ष विद्यार्थी
* २०१३ २२७५
* २०१४ २०४८
* २०१५ २८११
* २०१६ १९८३
* २०१७ २३२४