कोल्हापुरातील बनावट नोटा प्रकरण: खपवलेल्या नोटा शोधण्याचे आव्हान, संशयितांच्या घरांची झडती
By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2023 01:50 PM2023-01-24T13:50:54+5:302023-01-24T13:51:31+5:30
संशयितांच्या घरांमधून काही कागदपत्रे, बँकांचे पासबुक जप्त. त्याशिवाय विशेष वस्तू किंवा माहिती पोलिसांच्या हाती लागली
कोल्हापूर : बनावट नोटा छापून त्या खपवण्याचा प्रयत्न करणाऱ्या टोळीतील दोन संशयितांच्या घरांची झडती कळे पोलिसांनी सोमवारी (दि. २३) घेतली. तसेच बनावट नोटा छापण्यासाठी वापरलेल्या प्रिंटरच्या खरेदीचा पंचनामा कोल्हापुरातील शाहूपुरीच्या तिसऱ्या गल्लीतील किशन फोटो प्लाझामध्ये करण्यात आला. संशयितांनी बाजारात खपवलेल्या बनावट नोटा शोधण्याचे आव्हान पोलिसांसमोर निर्माण झाले आहे.
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने शुक्रवारी (दि. २०) बनावट नोटा छापणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश केला होता. त्या गुन्ह्याचा पुढील तपास कळे पोलिसांकडून सुरू असून, सोमवारी संदीप बाळू कांबळे (वय ३८, रा. कळे, ता. पन्हाळा) आणि अभिजित राजेंद्र पवार (वय ४०, रा. गडमुडशिंगी, ता. करवीर) या दोघांच्या घरांची झडती घेतली. दोन्ही संशयितांच्या घरांमधून काही कागदपत्रे, बँकांचे पासबुक जप्त करण्यात आले. त्याशिवाय विशेष वस्तू किंवा माहिती पोलिसांच्या हाती लागली नाही.
संशयितांनी नोटा छापण्यासाठी कोल्हापुरातील शाहूपुरी येथील किशन फोटो प्लाझामधून प्रिंटरची खरेदी केली होती. १०० आणि ५०० रुपयांच्या नोटांवरील महात्मा गांधीजींच्या फोटोचे डिझाईन याच ठिकाणाहून तयार करून घेतल्याचा संशय पोलिसांना आहे. त्या अनुषंगाने पोलिसांचा तपास सुरू आहे. पोलिसांनी संशयितांच्या उपस्थितीत प्रिंटर खरेदीचा पंचनामा करून किशन फोटो प्लाझामधील विक्रेत्याचा जबाब नोंदवला, अशी माहिती कळे पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक प्रमोद सुर्वे यांनी दिली.
बनावट नोटा खपवल्याची कबुली
अटकेतील चार संशयितांपैकी संदीप कांबळे याने काही बनावट नोटा खपवल्याची कबुली दिली आहे. ग्रामपंचायत निवडणुकीसाठी ३० हजार रुपयांच्या बदल्यात एक लाख रुपयांच्या नोटा दिल्याची चर्चा आहे, मात्र त्याचे ठोस पुरावे नसल्याचे पोलिसांनी सांगितले. बाजारात खपवलेल्या नोटा शोधण्याचेही आव्हान पोलिसांसमोर निर्माण झाले आहे. बनावट नोटांवरील नंबरची माहिती जाहीर करून या नोटांचा वापर थांबवावा, असे आवाहन करण्याचा पर्याय असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.