कोल्हापूर : शहीद पोलिसांची कुटुंबे भारावून गेली, कुटुंबीयांतील ८२ जण सहलीवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2018 10:29 AM2018-06-30T10:29:31+5:302018-06-30T10:34:33+5:30
गडचिरोली येथे नक्षलवाद्यांशी लढताना शहीद झालेल्या पोलिसांच्या कुटुंबीयांचा विशेष सत्कार पोलीस प्रशासनाच्या वतीने शुक्रवारी करण्यात आला. ही कुटुंबीय त्यांच्या दहशतीच्या वातावरणातून बाहेर पडावेत, त्यांना महाराष्ट्र दर्शन घडवावे या हेतूने शासनाने ४० शहीद पोलिसांच्या कुटुंबीयांतील ८२ जणांना सहलीवर पाठवले आहे. ही सहल दोन दिवसांपूर्वी कोल्हापूर दौऱ्यावर आली. त्यांचे स्वागत पोलीस दलाच्यावतीने करण्यात आले.
कोल्हापूर : गडचिरोली येथे नक्षलवाद्यांशी लढताना शहीद झालेल्या पोलिसांच्या कुटुंबीयांचा विशेष सत्कार पोलीस प्रशासनाच्या वतीने शुक्रवारी करण्यात आला. ही कुटुंबीय त्यांच्या दहशतीच्या वातावरणातून बाहेर पडावेत, त्यांना महाराष्ट्र दर्शन घडवावे या हेतूने शासनाने ४० शहीद पोलिसांच्या कुटुंबीयांतील ८२ जणांना सहलीवर पाठवले आहे. ही सहल दोन दिवसांपूर्वी कोल्हापूर दौऱ्यावर आली. त्यांचे स्वागत पोलीस दलाच्यावतीने करण्यात आले.
राहण्या-जेवण्याची सोय, अंबाबाई, जोतिबाचे दर्शन घडवून आणून या सर्वांचा अप्पर पोलीस अधीक्षक तिरूपती काकडे यांच्या हस्ते अंबाबाई देवीची प्रतिमा देत सत्कार केला. कोल्हापूर पोलिसांकडून मिळालेली आपुलकीची माया पाहून कुटुंबीय भारावून गेले.
शहीद पोलिसांच्या कुटुंबीयांनी दोन दिवसांच्या वास्तव्यात कोल्हापूर शहरातील अंबाबाई मंदिर, भवानी मंडप, रंकाळा, न्यू पॅलेस पन्हाळा, पोलीस उद्यानासह जोतिबा, नृसिंहवाडी, कणेरी मठ ही प्रेक्षणीय स्थळे पाहिली. पन्हाळ्यातील दाट धुक्याचा मनमुराद आनंद त्यांनी घेतला.
या सर्व कुटुंबीयांचा पोलीस दलाच्यावतीने पाहुणचार केला. शुक्रवारी या कुटुंबीयांना निरोप देण्यासाठी पोलीस मुख्यालयातील अलंकार हॉल येथे सर्वजण जमले होते. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक काकडे यांनी मार्गदर्शन करून कुटुंबीयांचा सत्कार केला.
यावेळी गृह पोलीस उपअधीक्षक सतीश माने, शहर पोलीस उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर, शाहूपुरीचे निरीक्षक संजय मोरे, शहर वाहतूक शाखेचे निरीक्षक अनिल गुजर, जुना राजवाड्याचे निरीक्षक मानसिंग खोचे, सहायक पोलीस निरीक्षक गजेंद्र लोहार, आदी उपस्थित होते.