Kolhapur- शक्तिपीठ महामार्ग: १२ जुलै पर्यंत रद्दचा निर्णय घ्या, अन्यथा..; सतेज पाटील यांचा सरकारला इशारा
By राजाराम लोंढे | Published: June 18, 2024 03:41 PM2024-06-18T15:41:15+5:302024-06-18T15:42:27+5:30
कोल्हापुरात शेतकऱ्यांची जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक
कोल्हापूर : नागपूर ते गोवा या शक्तिपीठ महामार्गाला विरोध करण्यासाठी आज, मंगळवारी कोल्हापुरातील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. हजारो शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरत राज्य सरकारच्या दडपशाही धोरणाला कडाडून विरोध केला. सरकारने १२ जुलै पर्यंत महामार्गाला स्थगिती नव्हे तर रद्दचा निर्णय घ्यावा अन्यथा महामार्ग रोको करु, जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत रात्रंदिवस रस्त्यावरुन हलणार नसल्याचा इशारा काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी दिला.
शक्तिपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीच्या वतीने आयोजित केलेल्या मोर्चात जिल्ह्यात शेतकरी स्वयंस्फुर्तीने सहभागी झाल होते. ‘राज्य सरकारचे करायचे काय?’, ‘खोकेबाज सरकारचा धिक्कार असो’, शेतकरी एकजुटीचा विजय असो अशा घोषणा देत शेतकऱ्यांनी दुपारी साडे बारा वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. यावेळेली झालेल्या सभेत सर्वच पक्षाच्या नेत्यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्ला चढवला.
काँग्रेसचे आमदार सतेज पाटील म्हणाले, राज्य सरकारमधील मंत्री, आमदार शक्तीपीठ विरोधातील भूमिका घेत असताना प्रशासनातील अधिकारी शेतकऱ्यांना नोटीसा कशा काढतात? या रस्त्यावर शेतकऱ्यांनी यापुर्वी हरकती नोंदवल्या होत्या, त्याची सुनावणी न घेता दाबून निर्णय घेणार असाल तर ते खपवून घेणार नाही. आंदोलनात फुट पाडण्याचा डाव राज्य सरकारचा असून एखाद्याला ५० लाखांचा धनादेश दिला जाईल, पण त्याला भुलू नका. कोणत्याही परिस्थितीत एक इंचही जमीन रस्त्यासाठी देणार नाही, याची शपथ घेऊनच येथे घरी जाऊया.
खासदार शाहू छत्रपती, ‘स्वाभिमानी’चे नेते राजू शेट्टी, आमदार राजू आवळे, आमदार ऋतुराज पाटील, माजी आमदार संजय घाटगे, डॉ. भारत पाटणकर, के. पी. पाटील, विजय देवणे, शिवाजी मगदूम, संपत देसाई, गिरीश फोंडे आदींनी मनोगत व्यक्त केले.
शुक्रवारपर्यंत १०० टक्के हरकती द्या
तांत्रीक लढाईत कोठेही मागे पडू नये, यासाठी शुक्रवार (दि. २१) पर्यंत १०० टक्के हरकती गोळा करा. न्याय व्यवस्थेवर विश्वास आहे, पण आता न्यायालयात न जाता रस्त्यावरच लढाई लढायची असल्याचे आमदार सतेज पाटील यांनी सांगितले.
तर कागलची जनता राजकारणावर बुलडोझर फिरवेल
उद्धवसेनेचे सहसंपर्क प्रमुख विजय देवणे यांनी राज्य सरकारवर हल्ला चढवताना पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनाही टार्गेट केले. महामार्ग कागलमधून जातो, याचे भान ठेवा, अन्यथा तुमच्या राजकारणावर बुलडोझर फिरवल्याशिवाय कागलची जनता गप्प बसणार नसल्याचा इशाराही दिला.