कोल्हापूर : रुबेलाचा संसर्ग झाल्यास जन्मजात दोष होण्याची भीती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2018 11:27 AM2018-09-27T11:27:49+5:302018-09-27T11:30:41+5:30
कोल्हापूर महानगरपालिका आरोग्य विभागातर्फे गोवर व रुबेला लसीकरण मोहीम नोव्हेंबर २०१८ मध्ये राबविण्याकरिता मुख्याध्यापक व नोडल टिचर यांची कार्यशाळा केशवराव भोसले नाट्यगृहात पार पडली.
कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिका आरोग्य विभागातर्फे गोवर व रुबेला लसीकरण मोहीम नोव्हेंबर २०१८ मध्ये राबविण्यात येणार असून, सदर मोहीम यशस्वीपणे राबविण्याकरिता महानगरपालिका कार्यक्षेत्रातील सर्व शाळेमधील मुख्याध्यापक व नोडल टिचर यांची कार्यशाळा मंगळवारी केशवराव भोसले नाट्यगृहात पार पडली.
आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप पाटील यांनी प्रास्ताविक केले. भारत सरकारने सन २०२० सालापर्यंत गोवर या आजाराचे निर्मूलन व रुबेला या आजाराचे नियंत्रण करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. महापालिकेच्या कार्यक्षेत्रामध्ये ०९ महिने ते १५ वर्ष वयोगटातील मुलांचे गोवर रुबेला एक इंजेक्शनद्वारे लसीकरण करण्यात येणार आहे.
रुबेलाचा संसर्ग झाल्यास गर्भपात किंवा अंधत्व, बहिरेपणा यांसारखे जन्मजात दोष होऊ शकतात. समाजात या मोहिमेची जनजागृती करणे गरजेचे आहे. तसेच पहिले दोन आठवडे गोवर रुबेला मोहीम शाळेमध्ये राबविण्यात येणार असल्याचे डॉ. पाटील यांनी सांगितले.
यावेळी प्राथमिक शिक्षण समिती सभापती अशोक जाधव यांनी गोवर व रुबेला लसीकरण मोहीम यशस्वी करण्यासाठी मार्गदर्शन केले. गोवर हा अत्यंत घातक व संक्रामक आजार आहे, तर रुबेला हा सौम्य संक्रामक आजार असल्याने त्याची लसीकरण मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी जनजागृती करणे आवश्यक आहे, असे उपायुक्त मंगेश शिंदे यांनी सांगितले.
नोडल अधिकारी डॉ. अमोलकुमार माने यांनी यावेळी स्लाईड शो द्वारे मुख्याध्यापक व नोडल टिचर यांना गोवर रुबेला मोहिमेबद्दल सविस्तर माहिती दिली. आरोग्य संघटनेचे डॉ. अभिमन्यू खरे यांनीही गोवर व रुबेलाबाबत मार्गदर्शन केले. लसीकरण अधिकारी डॉ. रुपाली यादव यांनी सूत्रसंचालन केले.
सदर कार्यशाळेस आरोग्य संघटनेचे प्रमुख डॉ. खरे, प्रशासन अधिकारी एस. के. यादव, शैक्षणिक पर्यवेक्षक विजय माळी, बाळासो कांबळे, सर्व शिक्षक, नोडल टिचर व प्राथमिक नागरी आरोग्य केंद्रातील सर्व वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.