कोल्हापूर : महाविद्यालयातील रिक्त पदे तत्काळ भरा, प्राध्यापकांची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2018 05:22 PM2018-08-20T17:22:40+5:302018-08-20T17:25:10+5:30
‘महाविद्यालयातील रिक्त पदे तत्काळ भरा’, ‘ सर्व शिक्षकांना जुनी पेन्शन योजना मिळालीच पाहिजे’ अशा घोषणा देत प्राध्यापकांनी विविध प्रलंबित मागण्यांसाठी सोमवारी निदर्शने केली.
कोल्हापूर : ‘महाविद्यालयातील रिक्त पदे तत्काळ भरा’, ‘ सर्व शिक्षकांना जुनी पेन्शन योजना मिळालीच पाहिजे’ अशा घोषणा देत प्राध्यापकांनी विविध प्रलंबित मागण्यांसाठी सोमवारी निदर्शने केली. शिवाजी विद्यापीठ शिक्षक संघा (सुटा)च्या नेतृत्वाखाली त्यांनी कोल्हापूर विभागीय शिक्षण सहसंचालक कार्यालयासमोर हे आंदोलन केले.
महाराष्ट्र प्राध्यापक महासंघाने (एम्फुक्टो) विविध प्रलंबित मागण्यांसाठी दि. २ जुलैपासून राज्यव्यापी आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनातील एक टप्पा म्हणून कोल्हापूर विभागीय शिक्षण सहसंचालक कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. या ठिकाणी प्राध्यापकांनी ‘सातव्या वेतन आयोग लागू करा’, ‘७१ दिवसांचा पगार मिळालाच पाहिजे’, अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला.
|
त्यानंतर झालेल्या सभेत ‘सुटा’चे अध्यक्ष डॉ. आर. एच. पाटील, कोल्हापूरचे सहकार्यवाह प्रा. सुभाष जाधव यांनी मार्गदर्शन केले. विविध मागण्यांचे निवेदन शिक्षण सहसंचालक कार्यालयातील प्रशासनाधिकारी डी. पी. माने यांना दिले. या आंदोलनात ‘सुटा’चे सुधाकर मानकर, आर. जी. कोरबू, प्रकाश कुंभार, टी. व्ही. स्वामी, डी. एन. पाटील, अरुण पाटील, ए. बी. पाटील, यू. ए. वाघमारे, इला जोगी, आर. के. चव्हाण, युवराज पाटील, एस. एम. पवार, आदींसह कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यांतील प्राध्यापक सहभागी झाले.
प्रलंबित मागण्या
- राज्य शासनाने नोकरभरतीवरील बंदी त्वरित उठवावी.
- यूजीसीच्या नियमांप्रमाणे सर्व शिक्षकांना त्यांचे सेवानिवृत्तीचे वय वाढवून द्यावे.
- उच्च शिक्षण संचालक, सहसंचालकांच्या कार्यालयीन कार्यप्रणालीतील एकाधिकारशाही संपुष्टात आणावी.
- सीएचबीधारक प्राध्यापकांना नियमित वेतन मिळालेच पाहिजे.
पुणे येथे राज्यव्यापी निदर्शने
राज्यातील प्राध्यापकांच्या रिक्त जागा त्वरित कायमस्वरूपी भराव्यात. सन २०१३ मध्ये परीक्षेच्या कामकाजावर बहिष्कार कालावधीतील रोखलेले वेतन त्वरित अदा करावे. सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशींची त्वरित अंमलबजावणी करावी. जुनी पेन्शन योजना लागू करावी, अशा विविध मागण्या शासनाकडे प्रलंबित आहेत. त्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी ‘एम्फुक्टो’तर्फे टप्प्याटप्प्याने तीव्र आंदोलन केले जाणार आहे. त्याअंतर्गत निदर्शने करण्यात आली. यानंतर दि. २७ आॅगस्टला पुणे येथील शिक्षण संचालक कार्यालयासमोर राज्यव्यापी निदर्शने केली जाणार आहेत, अशी माहिती प्रा. जाधव यांनी दिली.