कोल्हापूर : शालिनी सिनेटोनसाठी कोल्हापुरात ‘चित्रपट व्यवसाय वर्धापन दिन’ ‘काळा दिन’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2018 10:56 AM2018-12-01T10:56:35+5:302018-12-01T15:58:29+5:30
शालिनी सिनेटोनची जागा बिल्डरच्या ताब्यात गेल्याचे जाहीर झाल्याने चित्रपट व्यावसाय आणि कोल्हापूरचे वातावरण ढवळून निघाले. जागा वाचवण्यासाठी चित्रपट महामंडळाने जनआदंोलन जाहीर केले असून त्याचा पहिला दिवस म्हणून शनिवारी साजरा होणारा चित्रपट व्यवसाय वर्धापन दिन हा काळा दिवस पाळण्यात आला.
कोल्हापूर : महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी व शासन म्हणून काम करणाऱ्या मंत्र्यांनी शालिनी सिनेटोनची जागा धोक्याने बिल्डरच्या घशात घातली आहे. त्यांच्या या नतद्रष्ट कारभारामुळे आज दुर्देवाने आम्हाला चित्रपट व्यवसाय वर्धापन दिन हा काळा दिवस म्हणून पाळावा लागतोय. पण काहिही झालं तरी आम्ही ही जागा वाचवूच असा निर्धार शनिवारी चित्रपट व्यावसायिकांनी केला. या आंदोलनात कलासक्त कोल्हापूरच्या जनतेने साथ द्यावी असे आवाहनही करण्यात आले.
कलामहर्षि बाबूराव पेंटर यांनी महाराष्ट्र फिल्म कंपनीची स्थापना केली तो १ डिसेंबर हा दिवस कोल्हापूरचा चत्रपट व्यवसाय वर्धापन दिन म्हणून साजरा केला जातो. मात्र गेल्या चार दिवसात झालेल्या घडामोडीत शालिनी सिनेटोनची जागा बिल्डरच्या ताब्यात गेल्याचे जाहीर झाल्याने चित्रपट व्यावसाय आणि कोल्हापूरचे वातावरण ढवळून निघाले. जागा वाचवण्यासाठी चित्रपट महामंडळाने जनआदंोलन जाहीर केले असून त्याचा पहिला दिवस म्हणून शनिवारी साजरा होणारा चित्रपट व्यवसाय वर्धापन दिन हा काळा दिवस पाळण्यात आला.
सकाळी १० वाजता खरी कॉर्नर येथील कॅमेरास्तंभासमोर चित्रपट व्यावसायिक एकत्र आले. सर्वांनी काळ््या फिती लावून महापालिकेचे अधिकारी व शासनाचा निषेध केला.
अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले म्हणाले, महापालिका पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांनी जाणिवपूर्वक या प्रश्नाकडे दुर्लक्ष केले आहे. आज काळा दिन पाळून संबंधित यंत्रणेचा निषेध नोंदवला आहे. सोमवारी (दि. ३) महापालिका आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांना घेराव घालणार आहे. या आंदोलनात सर्वांनी सहभागी व्हावे.''
यावेळी नगरविकास राज्यमंत्री रणजित पाटील यांच्यासह बिल्डर व महापालिका प्रशासनाच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या. चित्रपट महामंडळाचे उपाध्यक्ष धनाजी यमकर, रणजीत जाधव, सुभाष भुरके, दिग्दर्शक यशवंत भालकर, ज्येष्ठ अभिनेते भालचंद्र कुलकर्णी, मिलिंद अष्टेकर, शरद चव्हाण, सतीश बीडकर, सतीश रणदिवे, अर्जुन नलवडे, चंद्रकांत जोशी, श्रीकांत डिग्रजकर, विजयमाला पेंटर, सुरेखा शहा, शुभांगी साळोखे, हेमसुवर्णा मिरजकर, अर्जुन नलवडे, सुरेंद्र पन्हाळकर, अमर मोरे, अरुण चोपदार यांच्यासह चित्रपट व्यावसायिक उपस्थित होते.
पालकमंत्र्यांना भेटणार
मेघराज भोसले म्हणाले, नगरविकास राज्यमंत्री रणजित पाटील यांनी अपील मंजूर केले असले तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ते रद्द करू शकतात. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली जाणार आहे. त्यासाठी रविवारी चित्रपट व्यावसायिक पालकमंत्र्यांची भेट घेणार आहेत. या चर्चेतूनही काही सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्यास न्यायालयीन लढाई करू.