कोल्हापूर : अखेरच्या टप्प्यात ‘हापूस’ जोरात, बुधवारी बाजार समितीत १४ हजार बॉक्सची आवक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2018 06:05 PM2018-05-23T18:05:36+5:302018-05-23T18:05:36+5:30
आंब्यांचा हंगाम अंतिम टप्प्यात आला असला तरी कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीत तब्बल १४ हजार बॉक्स आणि ४ हजार ६४० पेट्यांची आवक झाली आहे. आवक वाढल्याने दरातही थोडीफार घसरण झाली असून, ‘रत्नागिरी’, ‘देवगड’ हापूस आंबा १५० रुपये डझनापर्यंत आला आहे.
कोल्हापूर : आंब्यांचा हंगाम अंतिम टप्प्यात आला असला तरी कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीत तब्बल १४ हजार बॉक्स आणि ४ हजार ६४० पेट्यांची आवक झाली आहे. आवक वाढल्याने दरातही थोडीफार घसरण झाली असून, ‘रत्नागिरी’, ‘देवगड’ हापूस आंबा १५० रुपये डझनापर्यंत आला आहे.
यंदा ‘ओखी’ वादळाने आंब्यावर दुष्परिणाम झाले होते. त्यामुळे आवक कमी होऊन दर चढेच राहतील, असा अंदाज होता; पण हापूस आंब्यांची आवक चांगली राहिली. जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत आंब्याचा हंगाम असला तरी मे महिन्याच्या दुसऱ्या-तिसऱ्या आठवड्यापासून आवक हळूहळू कमी होत जाते; पण यंंदा मे महिन्याच्या अखेरच्या टप्प्यातही आवक चांगली आहे. विशेषत: कोकणातून अजूनही आंब्याची चांगली आवक होत असल्याने बाजारपेठा पिवळ्याधमक दिसत आहेत.
कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीत बुधवारी आंब्याची विक्रमी आवक झाली. ‘हापूस’, ‘पायरी’, ‘लालबाग’ आंब्यांचे बॉक्स १४ हजार, तर ४ हजार ६४० पेट्यांची आवक झाली. इतर ठिकाणांहून ‘मद्रास’ हापूसपेक्षा तिप्पट आवक सुरू आहे.
घाऊक बाजारात हापूसचा बॉक्स ५० ते १५० रुपये, तर पेटीचा दर २०० ते १२०० रुपये डझन आहे. ‘पायरी’चे दर कमी असून सरासरी १०० बॉक्स, ‘लालबाग’चा दर सरासरी ७५ रुपये बॉक्स आहे. मद्रास हापूसच्या पेटीचा दर सरासरी ४५० रुपये आहे.
बाजार समितीत आंब्याची पेटी व बॉक्सच्या अक्षरश: थप्प्या लागलेल्या आहेत. आवक जास्त असली तरी उठावही त्या पटीत आहे. त्यामुळे दरात मोठी घसरण दिसत नाही.
आंब्याचा दरदाम असा-
आंबा पेटी/ बॉक्स सरासरी दर
कोकण हापूस २६४० पेटी ७०० रुपये
कोकण हापूस ७४८५ बॉक्स १५० रुपये
कोकण पायरी ५२५ बॉक्स १०० रुपये
मद्रास हापूस १५०० पेटी ४५० रुपये
मद्रास हापूस २३५० बॉक्स १२५ रुपये
मद्रास पायरी ५०० पेटी २२५ रुपये
लालबाग २६०० बॉक्स ७५ रुपये