कोल्हापूर : अखेर अंबाबाई मंदिर पगारी पुजारी नियुक्ती विधेयक सादर, विधानसभेत होणार चर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2018 06:37 PM2018-03-27T18:37:39+5:302018-03-27T18:37:39+5:30
करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिर पगारी पुजारी नियुक्ती विधेयक मंगळवारी विधानसभेत सादर झाले. कोल्हापुरकरांकडून गेल्या नऊ महिन्यांपासून सुरू असलेल्या जनआंदोलनाचे फलित म्हणून शासनाने हे विधेयक सादर केले असून त्यावर आज बुधवारी चर्चा होवून शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.
कोल्हापूर : करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिर पगारी पुजारी नियुक्ती विधेयक मंगळवारी विधानसभेत सादर झाले. कोल्हापुरकरांकडून गेल्या नऊ महिन्यांपासून सुरू असलेल्या जनआंदोलनाचे फलित म्हणून शासनाने हे विधेयक सादर केले असून त्यावर बुधवारी चर्चा होवून शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.
श्रीपूजक बाबूराव ठाणेकर व अजित ठाणेकर यांनी दि. ९ जून २०१७ रोजी अंबाबाई मूर्तीला घागरा-चोलीचा पेहराव केल्यानंतर कोल्हापुरात अंबाबाई मंदिर पुजारी हटाओ आंदोलनाला सुरवात झाली. पंढरपूर, शिर्डी, सिद्धीविनायक या मंदिरांच्या धर्तीवर अंबाबाई मंदिरातही शासकीय पगारी पुजारी नेमण्यात यावेत या मागणीसाठी हे जनआंदोलन उभारले.
परिणामी त्यावेळी झालेल्या बैठकीत पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांपुढे याबाबत सुनावणी घेतली जावी, त्यांचा अहवाल आल्यानंतर पुढील तीन महिन्यात मंदिरात पगारी पुजारी नेमण्याचा कायदा करू असे आश्वासन दिले होते. तेंव्हापासून गेले नऊ महिने अंबाबाई मंदिर पुजारी हटाओ संघर्ष समितीच्यावतीने या प्रकरणाचा पाठपुरावा केला जात आहे.
दरम्यान आमदार राजेश क्षिरसागर यांनीही लक्षवेधीद्वारे हा प्रश्न विधानसभेत मांडला. त्यावर उत्तर देताना विधी व न्याय मंत्री रणजित पाटील यांनी कायदा तयार करण्यासाठी स्वतंत्र शासकीय समितीची नेमणूक करण्यात आली असून पुढील तीन महिन्यात पगारी पुजारी नियुक्तीचा कायदा करू अशी घोषणा केली होती.
अखेर तीन महिने, दोन महिने, पंधरा दिवस, पून्हा तीन महिने असा आश्वासनांचा, दिवस आणि महिन्यांचा प्रवास करत मंगळवारी दुपारी विधानसभा विधेयक क्रमांक ३३ करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अंबाबाई मंदिर हे विधेयक संसदीय कार्यमंत्री गिरीष बापट यांनी सादर केले. या विधेयकावर आणि त्यातील मसुद्यावर बुधवारी चर्चा होईल.
या चर्चेतील मुद्दे, आमदारांनी सुचवलेल्या सुचना अशा सर्व बाबींचा विचार करून त्यावर शिक्कामोर्तब होईल. विधानसभेनंतर त्यावर विधीमंडळात चर्चा होईल. तेथेही विधेयकाला मंजूरी मिळाल्यानंतर राज्यपाल अधिसुचना काढतील, त्याचे गॅझेट झाल्यानंतर विधेयकाचे कायद्यात रुपांतर होईल.
अंबाबाई मंदिरात पगारी पुजारी नियुक्तीचे विधेयक सादर होणे हे कोल्हापुरकरांच्या लढ्याचे यश आहे. विधेयकावर बुधवारी चर्चा होईल. मी स्वत: या चर्चेत भाग घेणार आहे. त्यात काही चुकीच्या तरतुदी असतील तर दुरुस्ती, येथील पूजाऱ्यांनाही सिद्धीविनायक, पंढरपूर येथील पूजाऱ्यांइतकाच पगार दिला जावा अशी मागणी करणार आहे.
आमदार
राजेश क्षीरसागर