कोल्हापूर :आगीचा बंब दुचाकीवर, दुचाकी मेकॅनिक संदीप गायकवाडची किमया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2018 12:08 PM2018-03-31T12:08:17+5:302018-03-31T12:15:13+5:30
अचानक लागलेल्या आगीवर त्वरित नियंत्रण मिळविण्यासाठी कोल्हापुरातील संदीप गायकवाड या दुचाकी मेकॅनिकने सुपर बाईक अर्थात आगीचा बंब दुचाकीवर तयार केला आहे. त्याने अग्निशमन करणारी सर्व यंत्रणा या दुचाकीवर बसविली आहे. त्याच्या या किमयेची चर्चा सर्वत्र सुरू आहे.
सचिन भोसले
कोल्हापूर : अचानक लागलेल्या आगीवर त्वरित नियंत्रण मिळविण्यासाठी कोल्हापुरातील संदीप गायकवाड या दुचाकी मेकॅनिकने सुपर बाईक अर्थात आगीचा बंब दुचाकीवर तयार केला आहे. त्याने अग्निशमन करणारी सर्व यंत्रणा या दुचाकीवर बसविली आहे. त्याच्या या किमयेची चर्चा सर्वत्र सुरू आहे.
सद्य:स्थितीत राज्यात कुठे ना कुठे तरी आग लागल्याचे आपण रोज वृत्तपत्रांतून वाचत असतो व दूरचित्रवाणीवरून त्याचे प्रसारणही पाहतो. अशा आगींवर नियंत्रण मिळविण्यासाठी अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी पोहोचेपर्यंत ही आग रौद्ररूप धारण करते. त्यातून वित्त व जीवितहानी मोठ्या प्रमाणात होते.
हे नुकसान टाळण्यासाठी आणि घटनास्थळी जलद गतीने पोहोचण्यासाठी कोल्हापुरातील दुचाकी मेकॅनिक संदीप गायकवाडने एक अफलातून ‘फायर बाईक’ तयार केली आहे. या दुचाकीमध्ये अग्निप्रतिबंधक बंब, मोठे सर्चलाईट, मोबाईलद्वारे नेमक्या स्थळी पोहोचण्यासाठी ‘जीपीआरएस मॅप’ची सोय केली आहे.
जखमींवर प्राथमिक औषध उपचारासाठीची औषधांनी युक्त पेटी, अग्नी प्रतिबंधक हेल्मेट, एखाद्या चारचाकीला आग लागल्यानंतर तिचे बॉनेट उघडण्यासाठी विशेष लोखंडी साहित्यही त्याने या बाईकमध्ये ठेवण्याची सोय केली आहे. यासह सायरनची सोयही केली आहे.
संदीप हा पाचगाव परिसरात राहतो. तो केवळ दहावी उत्तीर्ण आहे. त्याने दुचाकी दुरुस्तीचे तंत्रशुद्ध प्रशिक्षण घेतले असून तो घरपरिसरातच दुचाकी दुरुस्ती करतो. विशेष म्हणजे जोतिबाच्या यात्रेत येणाऱ्या भाविकांच्या नादुरुस्त झालेल्या दुचाकी मोफत दुरुस्त करून देण्याचे कामही तो करतो. या विशेष दुचाकीसाठी त्याला सुमारे ३५ हजार इतका खर्च आला आहे.
गर्दीच्या ठिकाणी जेथे चारचाकी पोहोचू शकत नाही, त्या ठिकाणी ही दुचाकी सहजरीत्या पोहोचते. विशेष म्हणजे केवळ आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी नाही तर अपघातात सापडलेल्या चारचाकी वाहनचालकांच्या मदतीसाठीही त्याने या दुचाकीमध्ये साहित्य सुसज्ज ठेवले आहे. त्यामुळे या सुपर फायर बाईक कोल्हापूरकरांचे आकर्षण ठरत आहे.
मागील वर्षी जोतिबा डोंगर येथे चैत्र यात्रेत छोटी आग लागली. अशा छोट्या-मोठ्या आगीवर नियंत्रण ठेवण्यासाठी काहीतरी करावे, म्हणून मला ही कल्पना सुचली. त्यातून आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी काय साहित्य लागते याचा अभ्यास केला. याकरिता मला ३५ हजारांहून अधिक खर्च आला.
- संदीप गायकवाड,
दुचाकी मेकॅनिक