कोल्हापूर : अग्निशमन कराची अंमलबजावणी वादात, निर्णयाला व्यावसायिकांचाविरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2018 07:08 PM2018-03-15T19:08:12+5:302018-03-15T19:08:12+5:30
कोल्हापूर महानगरपालिकेची अग्निशमन सेवा सक्षम करण्याकरिता अग्निशमन कर लावण्याचा धोरणात्मक निर्णय २०१३ मध्ये घेतला. मात्र, या निर्णयाला तब्बल चार वर्षांनी शहरातील व्यावसायिकांनी विरोध दर्शविला असल्यामुळे हा कर वादात सापडला आहे.
कोल्हापूर : महानगरपालिकेची अग्निशमन सेवा सक्षम करण्याकरिता अग्निशमन कर लावण्याचा धोरणात्मक निर्णय २०१३ मध्ये घेतला. मात्र, या निर्णयाला तब्बल चार वर्षांनी शहरातील व्यावसायिकांनी विरोध दर्शविला असल्यामुळे हा कर वादात सापडला आहे.
धोरणात्मक निर्णय रद्द करावा, तर वार्षिक पन्नास लाखांच्या उत्पन्नावर पाणी सोडावे लागणार असल्याने मनपा प्रशासन व्यावसायिकांची मागणी मान्य करायला तयार नाहीत. त्यामुळे यंदा व्यवसाय परवाने नूतनीकरणाची प्रक्रिया रखडली जाण्याची शक्यता आहे.
कोल्हापूर महानगरपालिका शहरातील नागरिक, व्यावसायिक, उद्योजक, व्यापारी वर्ग या सर्वांना अग्निशमनची सेवा नि:शुल्क पुरवित आहे. त्यासाठी वेगळे कोणतेही शुल्क आकारले जात नाही. मात्र, या विभागाला उत्पन्नाचे कोणतेच स्रोत नसल्यामुळे काही नवीन अद्ययावत उपकरणांसह सेवा वाढविण्यावर मर्यादा येत आहेत. त्यामुळे २०१३ मध्ये महानगरपालिका आयुक्तांच्या शिफारशीनुसार स्थायी समिती व महासभेत अग्निशमन सेवा कर लावण्याचा धोरणात्मक निर्णय घेण्यात आला.
या धोरणात्मक निर्णयानुसार शहरात व्यवसाय करणाऱ्या विविध अशा ३८ प्रकारच्या व्यावसायिकांना अग्निशमन कराच्या कक्षेत घेण्यात आले. त्यांची संख्या दोन ते अडीच हजारांच्या घरात असून, त्यांच्यावर ५०० रुपयांपासून १० हजार रुपयांपर्यंत कर आकारण्यात येणार आहे. धोरणात्मक निर्णय झाल्यानंतर काही व्यावसायिकांनी प्रामाणिकपणे हा कर भरला; परंतु बहुतांश व्यावसायिकांनी त्याकडे पाठ फिरविली.
कर वसुलीची अंमलबाजावणी सुरू झाल्यापासून हा कर अग्निशमन दलाचे कर्मचारी गोळा करीत होते. मात्र, तो बहुतांशी लोक भरत नसल्याने निदर्शनास येताच गतवर्षापासून व्यवसायाचा परवाना नूतनीकरण करतानाच तो वसूल करण्याची आयुक्त अभिजित चौधरी यांनी अट घातली आहे. त्यामुळे आता अग्निशमन कर भरल्याशिवाय कोणत्याही व्यवसायाचे यापुढे नूतनीकरण होणार नाही म्हणूनच व्यावसायिकांनी या कराला विरोध दर्शविला आहे.
जर हा कर घ्यायचा नसेल तर त्याकरिता प्रशासनाने प्रस्ताव द्यावा लागेल किंवा महासभेने तसा ठराव मंजूर करून तो प्रशासनाकडे द्यावा लागेल. मात्र, उत्पन्नाशी निगडित हा विषय असल्याने आयुक्त हा निर्णय बदलण्याची शक्यता कमी आहे.
वेगळा कर कशाला घेता ?
कोल्हापूर शहरातील नागरिक, व्यावसायिक महानगरपालिकेच्या घरफाळ्यातून ‘फायर टॅक्स’ म्हणून आधीच कर वसुल करीत आहे. सर्वचजण तो नियमित भरत असतात. मग, हाच कर दुसºयांदा घेण्याचा महानगरपालिकेने प्रयत्न करू नये. तो अन्यायकारक ठरणार आहे.
आनंद माने, माजी अध्यक्ष,
कोल्हापूर चेंबर आॅफ कॉमर्स
सेवा सक्षम करण्याचा हेतू
शहरातील अग्निशमन सेवा अधिक सक्षम करण्याच्या हेतूने हा कर वसूल करण्याचा धोरणात्मक निर्णय महासभेने घेतला आहे. फक्त त्याच्या अंमलबजावणीची पद्धत बदलण्यात आली आहे. अग्निशमन दलाच्या सक्षमीकरणाकरिता हा कर सर्वांना भरावाच लागेल.
रणजित चिले, मुख्य अग्निशमन अधिकारी,
महानगरपालिका.