कोल्हापूर : ऊसगाळपात ‘विठ्ठलराव शिंदे’ प्रथम, तर ‘जवाहर’ दुसरा, राज्याचे चित्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2018 11:30 AM2018-02-22T11:30:41+5:302018-02-22T12:07:39+5:30
राज्यात यंदा बहुतांश साखर कारखान्यांचा हंगाम पूर्ण क्षमतेने सुरू असून, आतापर्यंत झालेल्या ऊसगाळपात सोलापूर जिल्ह्यातील विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना अग्रभागी असून, कोल्हापूर जिल्ह्यातील ‘जवाहर’ कारखाना दुसऱ्या क्रमांकावर आहे. साखर उताऱ्यात मात्र कोल्हापूरचा ‘दालमिया शुगर्स’ भारी ठरला आहे.
राजाराम लोंढे
कोल्हापूर : राज्यात यंदा बहुतांश साखर कारखान्यांचा हंगाम पूर्ण क्षमतेने सुरू असून, आतापर्यंत झालेल्या ऊसगाळपात सोलापूर जिल्ह्यातील विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना अग्रभागी असून, कोल्हापूर जिल्ह्यातील ‘जवाहर’ कारखाना दुसऱ्या क्रमांकावर आहे. साखर उताऱ्यात मात्र कोल्हापूरचा ‘दालमिया शुगर्स’ भारी ठरला आहे. गतवर्षीच्या तुलनेत २ कोटी ४८ लाख टनांनी गाळप वाढले आहे. सरासरी साखर उताऱ्यात मात्र ०.२५ टक्क्यांनी घट झाली आहे.
राज्यातील साखर कारखान्यांचा गळीत हंगाम अंतिम टप्प्यात आला असून येत्या आठ-दहा दिवसांनंतर हळूहळू कारखान्याची धुराडी थंड होण्यास सुरुवात होईल. गतवर्षीच्या तुलनेत यंदा उसाची उपलब्धता चांगली असल्याने कारखाने पूर्ण क्षमतेने हंगाम पूर्ण करतील असे चित्र आहे. गेले पावणेचार महिने कारखान्यांचा हंगाम सुरू आहे. कोल्हापूर विभाग वगळता उर्वरित जिल्ह्यातील हंगाम महिन्याभरात संपण्याची शक्यता आहे.
यंदा राज्यातील सहकारी ९९, तर ८६ खासगी अशा १८५ साखर कारखान्यांनी गळीत हंगाम घेतला आहे. आतापर्यंत ७ कोटी ११ लाख १३ हजार टन गाळप होऊन ७ कोटी ७६ लाख ६७ हजार क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे.
गतवर्षीपेक्षा २ कोटी ४८ लाख टनांनी ऊसगाळप वाढले असले तरी सरासरी उताऱ्यात मात्र थोडी घट झालेली दिसते. विभागनिहाय विचार करायचा म्हटल्यास ऊसगाळपात पुणे विभाग आघाडीवर असून त्यांनी २ कोटी ७९ लाख ८८ हजार टनांचे गाळप केले आहे; पण साखर उताऱ्यात कोल्हापूर विभाग आघाडीवर राहिला आहे.
आतापर्यंत झालेल्या गाळपात राज्यात सोलापूर जिल्ह्यातील विठ्ठलराव शिंदे साखर कारखाना अग्रेसर राहिला असून, त्यांनी १४ लाख ४७ हजार २६६ टन उसाचे गाळप करून १५ लाख ८९ हजार ८०० क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे.
त्यापाठोपाठ कोल्हापुरातील जवाहर साखर कारखान्याने १२ लाख ५ हजार ६७५ टन गाळप करून १४ लाख ८७ हजार १४० क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. अंबालिका (इंडेकॉम) अहमदनगर ११ लाख ३ हजार ७८५ टन, तर ‘सहकारमहर्षी सोलापूर’ने ९ लाख २ हजार १८४ टन गाळप केले आहे.
गाळपातील टॉप टेन कारखाने व साखर उतारा -
कारखाने गाळप उतारा टक्केवारी
विठ्ठलराव शिंदे, सोलापूर १४ लाख ४७ हजार १०.९८
जवाहर, कोल्हापूर १२ लाख ५ हजार १२.१९
अंबालिका, अहमदनगर ११ लाख ३ हजार ११.२५
सहकारमहर्षी, सोलापूर ९ लाख २ हजार ११.२३
वारणा, कोल्हापूर ८ लाख ७८ हजार ११.७२
दत्त, शिरोळ ८ लाख ६९ हजार ११.९७
सह्याद्री, सातारा ८ लाख ४३ हजार १२.२३
बारामती अॅग्रो ८ लाख ३१ हजार ११.१७
इंदापूर ८ लाख ७ हजार १०.६४
दालमिया, कोल्हापूर ७ लाख ६४ हजार १३.१६
दृष्टिक्षेपात राज्याचा हंगाम-
विभाग गाळप साखर उत्पादन उतारा
कोल्हापूर १ कोटी ६९ लाख २ कोटी ६ लाख १२.१६
पुणे २ कोटी ७९ लाख ३ कोटी ३ लाख १०.८५
अहमदनगर १ कोटी १ कोटी ५ लाख १०.४७
औरंगाबाद ६३ लाख ६० लाख ९.५१
नांदेड ८८ लाख ९१ लाख १०.३६
अमरावती ४ लाख ५ लाख १०.७०
नागपूर ४ लाख ४ लाख ९.७२